सामाजिक

पैलवानाने जिंकली सामाजिक बांधिलकी ची कुस्ती:मृत्यू शी केले दोन हात

शित्तूर तर्फ वारुण ( शिवाजी नांगरे ) : एकीकडे आई झाडावर अडकली, दुसरीकडे वडील पडलेल्या भिंतीखाली अडकलेले, नक्की अगोदर वाचवायचे कोणाला ? या द्विधा अवस्थेत अडकलेल्या मुलासह तिघानाही, बहाद्दर पैलवानाने धाडसाने आपल्या शेजाऱ्यांना वाचवले. आपले मरण डोळ्यासमोर दिसत असतानाही, या गड्याने मरणाशी दोन हात करीत हि, सामाजिक बांधिलकी ची कुस्ती शंभर टक्क्यांनी जिंकली.


हि घटना आहे, पुरात अडकलेल्या स्व. नामदेव पाटील यांची मुलगी, जावई,आणि नातू यांच्या कुटुंबाची आणि पैलवान धनाजी पाटील यांच्या कर्तुत्वाची. शाहुवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील शित्तूर तर्फ वारुण व उखळू गावाच्या हद्दीवर असलेल्या ‘ काळा डोह ‘ नावाच्या शेत वस्तीवरील. शित्तूर चे पाटील कुटुंबीय सुमारे पन्नास वर्षांपासून इथं रहात आहेत. रात्रीच्या वेळी वारणा माई भरून वाहत होती. म्हणून पाटील कुटुंबीय स्थलांतराच्या तयारीसाठी सामानाची बांधाबांध करण्यात मग्न होती. दरम्यान, मुलगा नदीला पाणी येत आहे,असे आपल्या आईला सांगत होता. आई बॅटरी च्या उजेडात पाणी किती आलंय, ते पहात असतानाच, मागून जोराचा कर्णकर्कश आवाज झाला, आणि त्यापाठोपाठ पाण्याचा मोठा लोट आला. पाण्याचा वेग एवढा होता कि, त्याची आई नदीकाठी २५ फुट लांब असलेल्या झाडावर फेकली गेली. त्यांचं नशीबंच बलवत्तर म्हणून त्या झाडावर अडकल्या. याचदरम्यान घराची भिंत कोसळली आणि वडील भिंतीखाली अडकले. पै.धनाजी पाटील यांना सुरुवातीला काहीच समजेना,त्या मुलाच्या आईकडे जायचे कि, वडिलांना वाचवायचे ?, या द्विधा अवस्थेत असतानाच पायाला काहीतरी चावले, त्याची कळ मेंदूपर्यंत गेली. पण आणीबाणी च्या काळात मागे हटेल, तो पैलवान कसला ? पैलवानांनी पुन्हा एकदा हिम्मत केली, आणि नदीकाठच्या झाडाकडे धाव घेतली. कारण जर झाड वाहून गेले, तर त्या मुलाची आई वाहून गेली असती. आंब्याच्या झाडावर मिणमिणत्या बॅटरी च्या प्रकाशात ती माऊली झाडावर जीव मुठीत धरून बसली होती. मरणाशी दोन हात करीत होती. निसर्गाच्या संकटाशी झुंज देत होती. दरम्यान पैलवान धनाजी पाटील झाडाजवळ पोहचले आणि त्या माऊलीला मृत्यू च्या दाढेतून परत आणले. इकडे पत्र्याखाली वडील अडकले होते. आईला घेवून पडलेल्या घराकडे आले, आणि वडिलांना सोडवले. आणि पैलवानांच्या धाडसामुळे मोठी जीवितहानी टळली.


दरम्यान, हि घटना कशी घडली ? हे कळलेच नाही. वारणा नदीच्या पुरामुळे कि, डोंगर कोसळल्यामुळे ? याची माहिती घेतली असता, उखळू गावाच्या हद्दीत शासनाने बांधलेल्या बंधाऱ्यावर डोंगराचा काही भाग कोसळला, आणि बंधाराच फुटला. ह्या फुटलेल्या बंधाऱ्याचे पाणी वाहून आल्याने हि दुर्घटना घडली. यातून शासनाने बांधलेले बंधारे निकृष्ट दर्जाचे होते का ? याची माहिती शासनाला आहे का ? कि, इतर कामांसारखे हि कामेसुद्धा दाबून न्यायचा शासन प्रयत्न करतंय ? ह्या घटनेची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी जनतेतून होत आहे.


असो,जे व्हायचे ते झाले, भविष्यात असे काही घडू नये, यासाठी नागरिकांनीच सतर्क राहण्याची गरज आहे. दरम्यान या घटनेतून कोणतीही जीवितहानी झाली नाही, हीच काय ती सकारात्मक बाजू.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!