संपादकीय

” बळी राजा ” तुझा बळी हा नेहमीचाच असेल…


बांबवडे : आपला देश कृषिप्रधान देश मानला जातो. म्हणजेच या देशात शेतीला सर्वाधिक महत्व आहे, असं निदान वरील वाक्यावरून मानावयास हरकत नाही. पण का कोण जाणे, इथं पहिला बळी त्या शेतकऱ्याचाच घेतला जातो. यात निसर्ग सुद्धा मागे रहात नाही. कधी पाऊस नाही म्हणून दुष्काळ, तर कधी अधिक पाऊस झाला, म्हणून ओला दुष्काळ . एकंदरीत काय पाऊस गरजेपुरता कधी पडणार ? या प्रश्नाचं उत्तर अद्याप कुणाला सापडलेलं नाही. परंतु यात बिचाऱ्या शेतकऱ्याचा काय दोष ? या प्रश्नावर शासन, संशोधक, हवामान खातं, कधी विचार करणार आहे कि नाही ?


आज जगात अनेक तंत्रज्ञान विकसित झालं आहे. अनेक मिसाईल बनवले जात आहेत. एवढेच नव्हे , तर पाऊस पाडण्याचा प्रयोग देखील झाला. पण या व्यतिरिक्त शेतकरी कसा जगला पाहिजे, यावर कधी विचार मंथन झालंय का ? आणि जर झालं असेल, ,तर त्याचं फलित काय निघालं ? हे सुद्धा महत्वाचं आहे. पण नाही, आपण आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी अनेक रुपयांच्या निधीची तरतूद करतो. परंतु हा पाऊस कधी, कसा,आणि किती पडणार ? यावर संशोधन का होत नाही ? यातून आम्हाला संशोधकांवर काही म्हणायचे नाही. पण इतर बाबींवर संशोधन होतंय, तर जो आम्हाला खाऊ घालतो, त्याच्या जगण्याची तरी तरतूद करणे, हे आपलं कर्तव्य नव्हे का ? पण हा पाऊस वेळेवर , गरजेपुरता पडण्यासाठी संशोधन होणे ,गरजेचे आहे. केवळ राम भरोसे हवामान खातं राहून चालणार नाही. या खात्यावर कडक उपाय योजना होणे, हि काळाची गरज आहे.


कधी पूर येतो,जनावरांसाहित माणसे उध्वस्त करून जातो, मग होतात पंचनामे. आणि दिली जाते मदत, एका फुटक्या पात्रात सुद्धा राहणार नाही, अशी. का या शेतकऱ्याला आपण इतकं लाचार करतो. यापेक्षा त्याच्या जगण्याची वेगळी तरतूद करता येते का, यावर विचार मंथन का होत नाही? सगळ्या क्षेत्रात अनेक समाजाला आरक्षण आहे, पण शेतकऱ्याला आरक्षण कधी दिलं गेलंय का ? तर याचं उत्तर नाही, असेच समोर येईल. यामुळे शेतकरी केवळ शेतीवरंच अवलंबून राहतो, आणि सुरु होते , त्याच्या जगण्याची परवड.. कधी पाऊस नसल्याने पिकं करपून जातात, तर कधी पूर आल्याने वाहून जातात. आत्ता तर परतीचा पाऊस सुद्धा या शेतकऱ्याच्या अंगावर नसलेल्या मांसाचे लचके तोडण्याचा यशस्वी प्रयत्न करीत आहे.


या शेतकऱ्याच्या दशेला नेमका कोण कारणीभूत आहे. तर स्वत: शेतकरीच आहे. जर खरंच शेतकऱ्याला जगायचं असेल, तर या सगळ्यांचा नाद सोडा, एक वर्ष फक्त स्वत: च्या खाण्यापुरतं पिकं घ्या. आयातीवर बंदी आणण्याचा दबाव शासनावर आणा. मग कसे मुठीत नाक धरून येतात ते पहा. केवळ नुकसानभरपाई घेवून संतुष्ट राहणार असाल, तर ” बळी राजा ” तुझा बळी हा नेहमीचाच असेल,यात शंका नाही.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!