बांधकाम कामगार नोंदणीचे शुल्क नेमके किती ?
बांबवडे : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई, इथं ऑनलाईन अर्ज नोंदणी करून, मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे. परंतु शाहुवाडी तालुक्यात कामगारांच्या नोंदणी करण्याकरिता अनेक संघटना निर्माण झाल्या आहेत. परंतु काही मंडळी या कामगारांकडून नोंदणी साठी अव्वा च्या सव्वा शुल्क घेत असल्याचे समजते.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई इथं नोंदणी करण्याकरिता किती शुल्क आकारावे, याची कोणतीही रक्कम ठरलेली नाही. तसेच मंडळाकडे नोंद असलेले कामगारच या मंडळाकडून मिळणाऱ्या सुविधा मिळण्यासाठी योग्य असतील. हे जरी खरे असले, तरी तालुक्यातील संघटनांनी या नोंदणीसाठी किती शुल्क घ्यावे ,याची एक रक्कम ठरवावी, जर ती नियमाप्रमाणे असेल,तरच. कारण बाहेरील तालुक्यातील मंडळी आपल्या तालुक्यात येवून सुमारे पाचशे ते सतराशे रुपयांपर्यंत रक्कम फक्त कामगार नोंदणीसाठी घेत असल्याचे समजत आहे.

कामगारांच्या अज्ञानाचा गैरफायदा काही मंडळी घेत असून, याला आळा बसावा, यासाठी शाहुवाडी तालुक्यातील संघटनांनी नोंदणीचे शुल्क किती असावे, तसेच शुल्क शासन नियंत्रित आहे का ? कि नोंदणी विनाशुल्क करता येते, याची माहिती बांधकाम कामगारांना द्यावी. यामुळे इतर तालुक्यातून येवून, आपल्या तालुक्यातील कामगारांना कोणी लुबाडणार नाही. आपला कामगार लुबाडणूकी पासून सुरक्षित राहील. याची नोंद घ्यावी.