बांबवडे इथं एका रात्रीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील पूर्वी असलेल्या एसटी.स्थानकामागील बाजूस भगवा ध्वज आहे. त्याच्यासमोर अज्ञात मंडळींनी अर्धाकृती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा एका रात्रीत बसवला असल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनेमुळे बांबवडे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान बांबवडे दूरक्षेत्र पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे. तरीदेखील याबाबत येथील पोलीस कर्मचाऱ्यांना याचा मागमूस देखील लागला नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री उशिरा पर्यंत या चौकात काहीच नव्हते. परंतु आज सकाळी पाहता छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा कॉंक्रीट च्या चबुतऱ्यावर बसविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. सदर बाबत बांबवडे दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात विचारणा केली असता,त्यांनाही याबाबत काही माहिती नसल्याचे समजते.