बांबवडे येथील एटीएम सेंटर ” असून खोळंबा आणि नसून घोटाळा “
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं सदा बंद एटीएम सेंटर ची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. बांबवडे, हि तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून, इथं लाखो रुपयांची उलाढाल होत असते. तरीदेखील इथली एटीएम सेंटर नेहमीच बंद अवस्थेत असतात.
बांबवडे इथं एकच राष्ट्रीयकृत बँक असल्याने, अनेकांना या बँकेच्या भरवशावरच अनेक वर्ष आपली आर्थिक उलाढाल करावी लागत आहे. या बँकेत पेंशनर यांच्यासहित व्यापारीवर्ग त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांची खाती सुद्धा आहेत. परंतु या बँकेचे एटीएम मात्र सदाबंद अवस्थेत असते. जरी चालू असले, तरी काहीवेळातच यातील पैसे संपतात. दरम्यान बँकेने काढलेले “ग्राहक मित्र केंद्र ” मात्र सुरु असते. त्यामुळे लोकांची गरज भागते. परंतु जर असेच असेल, तर एटीएम सेंटर बंदच करावीत. कारण ” असून खोळंबा आणि नसून घोटाळा ” पाहिजेच कशाला? अशा अनेक तक्रारी ग्राहकांच्या आहेत. केवळ राष्ट्रीयकृत बँक नव्हे, तर इतर बँकांची एटीएम सेंटर सुद्धा नावालाच उघडी असतात. कारण त्यामध्ये पैसे नसतात, किंवा ते आउट ऑफ ऑर्डर असते. यापैकी इंडस इंड बँकेचे एटीएम सेंटर मात्र विनातक्रार सुरु आहे.

एकंदरीत काय, या बँकांनी आपली एटीएम सेंटर कायमस्वरूपी सुरु राहतील, याकडे लक्ष दिल्यास अनेक ग्राहकांना त्याचा फायदा होईल.