बांबवडे ” वाहतूक कोंडी ” नक्की जबाबदारी कोणाची ?
बांबवडे ( विशेष प्रतिनिधी ) : बांबवडे तालुका शाहुवाडी हि तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ आहे. इथं नेहमीच वाहनांची वाहतूक कोंडी होते. यावर येथील पोलीस कर्मचारी मात्र निवांत असतात. हि मंडळी वाहतुकीची कोंडी झालेली असताना, वाहतूक नियंत्रक पोलीस मात्र इतर खाजगी वाहनातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये बसून चकाट्या पिटण्यात मग्न असतात. आणि इतर वेळी मात्र बांबवडे चौकाची जागा सोडून, हि मंडळी मात्र” इतर ठिकाणी ” उभे राहून, आपले कर्तव्य बजावताना आम्ही अनेकवेळा पाहिले आहे.

वाहतूक कोंडी यावर प्रसिद्ध झालेल्या वृत्तावर पोलीस निरीक्षक पाटील यांनी ग्रामपंचायत व हायवे पोलीस यांच्याशी चर्चा करतो, असे आश्वासन दिले. परंतु वाहतुकीची कोंडी आणि ग्रामपंचायत आणि हायवे कार्यालय यांचा काहीही संबंध नाही. कारण वाहतूक कोंडी ज्यावेळी होते, त्या वेळी पूर्ण बांबवडे चौकी सुद्धा निवांत असते. येथील कर्मचारी फक्त स्वत:तच मग्न असतात. हाकेच्या अंतरावर असलेली चौकी कोणत्याही वाहनाला ‘ पुढे चल ‘ म्हणून सुद्धा कधी सांगताना दिसत नाही. दरम्यान येथील पार्किंग व्यवस्था नक्की आहे कुठे ? हा प्रश्न आहे. अंबीरा पुलावर रस्त्याच्या दुतर्फा खाजगी वाहतूक करणारे, वहानं लावून निवांत असतात. दरम्यान पुलावर वाहन पार्किंग करणे, हे कायद्यात बसते का ? हा सुद्धा प्रश्न आहे. यावर कुणीच बोलत नाही. हि जबाबदारी ग्रामपंचायत किंवा हायवे कार्यालयाची नव्हे, तर पोलीस खात्याची आहे. हे आम्ही विनम्रपणे सुचवू इच्छितो.

येथील काही पोलीस कर्मचारी आपली जबाबदारी किती “उत्तम” पाहतात, हे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकदा रस्त्यावर उतरून पहावी. हे महाशय नक्की कोणती जबाबदारी पार पाडतात, ते . ते केवळ एकच काम अतिशय इमाने- इतबारे पार पाडतात. ते काम कोणते ? हे सांगावयास नको., केवळ हेच नव्हे, तर मटक्याच्या चिठ्ठ्या हवेत विरून गेल्या, तर आत्ता मोबाईल मटका सुरु झाला आहे, या विषयी जर पोलीस ठाणे अनभिज्ञ असेल, तर नवंलच आहे.

एवढेच नव्हे तर याच चौकीच्या हद्दीत सिगारेट मधून काय काय ओढले जाते, याची सुद्धा कुणालाच कल्पना नसावी, एवढे आपले पोलीस ठाणे अनभिज्ञ कसे ? याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शोध घेतला तर बरे होईल. याचबरोबर आपल्याच खात्यातील कर्मचाऱ्यांची थोडी खरी माहिती घेता आली तर बरे होईल.

दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी एकदा बांबवडे चौकीची शहानिशा करावी. वाहतूक कोंडी हा पोलिसांचा प्रश्न आहे. ग्रामपंचायत यावर काही बोलेल, असे वाटत नाही. किंबहुना ती त्यांची जबाबदारी सुद्धा नव्हे. आपली जबाबदारी वाचवण्यासाठी दुसऱ्यांकडे बोट दाखवणे , बरोबर नाही.
दरम्यान शाहुवाडी पोलीस ठाणे सुद्धा काही ठराविक पत्रकार मंडळींनाच वेळेत माहिती देतात. इतर पत्रकारांना माहिती देताना, मात्र दिरंगाई होते, अशी काही पत्रकारांची, पत्रकार संघाकडे तक्रार आहे. तेंव्हा याकडे देखील शाहुवाडी पोलीस ठाण्याने लक्ष द्यावे, हि विनंती. पोलीस आणि पत्रकार जेंव्हा समझोत्याने वागतील, तर बऱ्याच गोष्टी मार्गी लागण्यास मदत झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हे दोन्ही घटक समाजाचीच जबाबदारी उचलत आहेत.