बापाच्या काळजाचा ठोका म्हणजे लेक…: बालीकादिनाच्या शुभेच्छा
बांबवडे : बापाच्या काळजाचा ठोका म्हणजे लेक, आईच्या पापणीच्या अश्रुतील थेंब म्हणजे लेक, भावाचा अभिमान म्हणजे घरची लेक. आजीआजोबांचा जिव्हाळा म्हणजे लेक….स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या, अनंत अडचणींवर मात करीत मुलींसाठी पहिली शाळा सुरु करणाऱ्या, पहिल्या शिक्षिका म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त सर्वच लेकींना या बालीकादिनाच्या हार्दिक शुभेच्छा … आणि सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन .

मलाही मुलगी आहे, आणि तिचा मला अभिमान आहे. कारण ती सुद्धा माझ्यासाठी, माझ्या घरात जन्माला आलेल्या सावित्रीबाई यांचेच दुसरे रूप आहे. म्हणूनच माझ्या लेकीला आणि तिच्यासारख्या प्रत्येक बापाच्या प्रत्येक मुलीला या बालीकादिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या मुलींसाठी शैक्षणिक क्रांती घडविणाऱ्या महान लेकीचा जन्मदिवस . हा दिवस जर १८३१ साली सोन्याची झळाळी घेवून निर्माण झाला नसता, तर मुली इंजिनिअर, डॉक्टर, वकील, पायलट आणि अशा अनेक पदांवर विराजमान झाल्या नसत्या. त्या माऊलीने आजच्या दिवशी जन्म घेतला नसता, तर कोण जाणे आजही मुली चूल फुंकत बसताना पहायला मिळाल्या असत्या. त्या माऊलीने संपूर्ण समाजाचा रोष ओढवून घेतला, आणि शैक्षणिक क्रांती केली, म्हणून आज नव्या सावित्री जन्माला आलेल्या पहायला मिळत आहेत.

आज ज्या मुलींनी स्वत:च्या कर्तुत्वावर अनेक पदव्या मिळवल्या, अशा सर्वच मुलींचे अभिनंदन. आणि त्यांना या बालीकादिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज या मुली स्वत:च्या पायावर सक्षमतेने उभ्या आहेत. त्या त्यांनी केलेल्या कर्तुत्वावर. घरातील मंडळी आर्थिक मदत करतात, पण खऱ्या अर्थाने अभ्यास करणे, त्यासाठी जीव तोडून मेहनत करणे, या गोष्टी त्या मुलीच करतात. म्हणूनच त्यांचे श्रेय त्यांना देणे, गरजेचे आहे. अशा सर्वच मुलींना या बालीकादिनाच्या खूप खूप शुभेच्छा. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सारख्या अनेक क्रांतीज्योती निर्माण व्हाव्यात, हीच सदिच्छा.