बिबट्या गोगव्यात दाखल : वन विभाग पंचनामे करणे,व कॅमेरा लावणे एवढेच करणार काय ?
बांबवडे : गोगवे तालुका शाहुवाडी येथील करीम शहावाली बाबा दर्गा इथं बिबट्या चे दर्शन झाल्याचे समजते. अशी माहिती ग्रामस्थांतून मिळत आहे. दरम्यान दोन दिवसापूर्वी सावे येथील सतीचा माळ येथील पांडुरंग धोंडीबा कुंभार यांच्या दोन शेळ्या बिबट्याने मारल्या. सध्या गोगवे परिसरात बिबट्याचा वावर सुरु झाला आहे. त्याने एक पाळीव कुत्र्याला नेल्याचे समजते. तसेच काही ग्रामस्थांच्या निदर्शनास देखील आला आहे. ग्रामस्थांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन गोगवे गावचे सरपंच विकास पाटील यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

शिवारे, वडगाव , सरूड, शिंपे, सवते, सावे अशी गावे करून बिबट्या आता गोगवे गावच्या परिसरात निदर्शनास आला आहे. याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभाग काय काम करते , तर कॅमेरा लावणे, पंचनामे करणे, अशी कामे सुरु आहेत. केवळ अशी कामे करून चालणार नाही, तर त्याला पकडणे , हे वन विभागापुढे मोठे आव्हान आहे. वन विभाग म्हणेल कि, आमची कामे आम्हाला शिकवू नका . हे जरी खरे असले, तरी शेतकऱ्यांचे पशुधन बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. माणसाच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. म्हणजेच बिबट्याला पकडणे, हे मुख्य काम आहे. त्यासाठी वन खाते काय काम करते, यापेक्षा त्याचा योग्य परिणाम झाला का ? याचे उत्तर सामान्य जनतेच्या दृष्टीने गरजेचे आहे.

सध्या तरी कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरी भविष्यात ती होणार नाही,याची खात्री कोणी देवू शकत नाही. तेंव्हा बिबट्याला पकडणे, हेच मूळ कार्य वन विभागासाठी आव्हान आहे. हे नाही झाले, तर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. याची नोंद वन विभागाने घ्यावी.