भोसलेवाडी च्या केटीवेअर चे बरगे इरिगेशन काढणार का ? – उपसभापती विजयराव खोत
शाहुवाडी प्रतिनिधी : सध्या मान्सून पूर्व पावसाची संततधार चालू आहे. मान्सून चा पाऊस उंबरठ्यावर आहे. असे असताना, शाहुवाडी तालुक्यातील निळे पैकी भोसलेवाडी येथील बंधाऱ्याचे बरगे इरिगेशन विभागाच्या वतीने अद्याप न काढल्याने बंधारा पूर्णपणे भरला आहे. दरम्यान बंधाऱ्याच्या एका बाजूला जमीन भुसभुशीत झाल्याने खड्डा पडला आहे,यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. याबाबत शाहुवाडी पंचायत समिती चे उपसभापती विजयराव खोत यांनी बरगे त्वरित काढून घेण्याची मागणी इरिगेशन विभागाकडे केली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुद्धा तक्रार केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि , नेहमी पावसाळ्यापूर्वी प्रत्येक बंधाऱ्याचे बरगे इरिगेशन विभागाच्या वतीने, काढले जातात. त्यातच ‘ निसर्ग ‘ नावाच्या चक्रीवादाळामुळे पावसाची संततधार चालू आहे. यामुळे डोंगर कपारीतील पाण्याचा ओघ वाढला आहे. यामुळे निळे पैकी भोसलेवाडी येथील बंधारा पूर्ण भरलेला आहे. यातच बंधाराच्या एका बाजूची जमीन भुसभुशीत झाल्याने अंदाजे ७ फुट खोल खड्डा पडला आहे. त्याचबरोबर बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूच्या कडा निखळल्या गेल्या आहेत, अशी माहिती मिळत आहे. यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. या बंधाऱ्यावरून गावातील वाहतूक सुद्धा चालू असते . यामुळे बंधाऱ्यास भगदाड पडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर बाबीची नोंद घेऊन संबंधित विभागाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शाहुवाडी पंचायत समिती चे उपसभापती विजयराव खोत यांनी केली आहे.