मंजूर पेयजल योजना त्वरित पूर्ण कराव्यात, अन्यथा गंभीर परिणाम- आमदार कोरे
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यात सुरु असलेल्या विविध पेयजल योजनांची कामे त्वरित पूर्ण करून घ्यावीत. त्यामध्ये अधिकारी किंवा पदाधिकारी यांनी कोणतेही राजकारण आणू नये. सध्या उन्हाळा तीव्र होताना दिसत असताना,रखडलेल्या योजनांची कामे अधिकाऱ्यांनी त्वरित पूर्ण करून घ्यावीत ,अन्यथा गंभीर परिणाम होतील. असे मत शाहुवाडी-पन्हाळा मतदारसंघाचे आमदार डॉ. विनय कोरे यांनी व्यक्त केले.

सध्या शाहुवाडी तालुक्यातील सोनवडे इथं सुरु असलेल्या, रखडलेल्या पेयजल योजनेस पुनश्च सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर गोकुळ चे संचालक कर्णसिंह गायकवाड यांनी कार्यकर्त्यांसह आमदार कोरे यांची भेट घेतली, त्यावेळी आमदारांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

शाहुवाडी आणि पन्हाळा हा मतदारसंघ भौगोलिक दृष्ट्या किचकट आहे. त्यामुळे नव्या योजना खर्चिक होत आहेत. परंतु मंजूर झालेल्या योजना तरी अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून पूर्ण करून घ्याव्यात. यामध्ये कोणतेही राजकारण आणू नये. कारण याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे.

कर्णसिंह गायकवाड यांच्यासह माजी सभापती विष्णू पाटील, महादेव पाटील, रामचंद्र साळुंखे, आनंदराव तोरस्कर, अनिल पाटील आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.