मलकापुरातील पूरग्रस्त भागाचे कायमस्वरूपी स्थलांतरासाठी प्रयत्नशील -आम.डॉ.कोरे
शाहुवाडी प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर नगरपरिषद इथं शहरातील पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या स्थलांतराबाबत विशेष बैठक घेण्यात आली. येथील नागरिकांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहणार आहे. असे मत आमदार डॉ.विनय कोरे यांनी यावेळी व्यक्त केले.

मलकापूर शहरातील पूरग्रस्त भागांची पाहणी त्यांनी केली. दोन दिवसांपूर्वी आलेल्या महापुराने मलकापूर शहरातील कडवी, शाळी नदीकाठी असलेल्या सोमवार पेठ, शिवाजी स्टेडीयम परिसरातील पूरग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली. यावेळी कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक श्री सर्जेराव पाटील पेरीडकर, नगराध्यक्ष अमोल केसरकर उपस्थित होते.
यावेळी आमदार कोरे पुढे म्हणाले कि, अचानक आलेल्या पुरामुळे येथील भागाचे अतोनात नुकसान झाले आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांची सोय कायमस्वरूपी करण्यासाठी शासन स्तरावर विशेष प्रयत्न करणार आहे.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील म्हणाले कि, या पुढील काळातहि नागरिकांनी सतर्क राहून आपल्या आरोग्याची काळजी घेणे, गरजेचे आहे. पूर ओसरल्यानंतर रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. असे जरी असले तरी नागरिकांनी घाबरून जावू नये. पूरग्रस्त भागात सर्वोतोपरी मदत करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत,अशी ग्वाही देखील श्री पाटील यांनी दिली.

दरम्यान पूरग्रस्त भागातील नागरिकांना धान्य वाटप हि करण्यात आले.

याप्रसंगी नगरसेवक भारत गांधी, विकास देशमाने, माजी नगरसेवक किशोर सणगर, सागर ढोणे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.