मलकापुरात नव वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन संपन्न
मलकपूर प्रतिनिधी : मलकापूर तालुका शाहुवाडी इथं गुढी पाडव्या निमित्त पाच दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मागील दोन वर्षे कोरोना च्या अनुषंगाने कार्यक्रम न झाल्याने यंदा मात्र त्याची कसर मलकापूर नगरवासीयांनी भरून काढली.

गुढी पाडवा म्हणजे हिंदू धर्माप्रमाणे नूतन वर्षाचा पहिला दिवस. या दिवशी प्रत्येकजण नवीन वर्षांच्या शुभेच्छा आपल्या आप्तेष्ट,हितचिंतकांना देतात. या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मलकापूर नगर वासियांनी नववर्ष स्वागत यात्रा समिती निर्माण केली. या समितीच्या मार्गदर्शनानुसार पाच दिवस कार्यक्रम सुरु होते.

पहिल्या दिवशी देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमात सर्वच स्तरातील नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला. दुसऱ्या दिवशी मराठी ऐतिहासिक चित्रपट ” पावनखिंड ” दाखविण्यात आला. तिसऱ्या दिवशी मलकापूर नगरीतून महिलांची बाईक रॅली मोठ्या उत्साहात काढण्यात आली. यावेळी अनेक महिलांनी या मध्ये सहभाग घेतला होता. चौथ्या दिवशी नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची भव्य रांगोळी साकारण्यात आली होती. तर पाचव्या दिवशी भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. यामध्ये ढोल ताशा, लेझीम, झांजपथक च्या नादावर शोभा यात्रा फुलून गेली.
असा गुढी पाडव्याचा नववर्षाचा शुभारंभ मलकापूर इथं संपन्न झाला.