महापुराने होणारी उध्वस्तता थांबणार का ?
बांबवडे (दशरथ खुटाळे याजकडून ) : महापूर आला आणि गेला. गेल्यावर्षी सुद्धा हीच परिस्थिती होती. त्यावेळी सुद्धा पूर आला होता. काही तुटपुंजी मदत शासनाने जाहीर केली . परंतु त्यातून लोकांचे संसार उभे राहिले का ? महापुरावर काही तोडगा निघाला का ? हे असेच सुरु राहिले तर, महापूर येणे थांबेल का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘ नाही ‘ , अशी येतील. यासाठी अतिवृष्टी शिवाय, आणखी कोणती कारणे महापुराला जबादार आहेत, याचा विचार करणे गरजेचे आहे.


महापुराने पुन्हा एकदा ग्रामीण जिवन व्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. कधी नव्हे ते कोकणातील चिपळूण पाण्याखाली गेले. यासाठी केवळ निसर्ग जबाबदार आहे, असे नाही. कारण, काही कारणे मानवनिर्मित आहेत. शाहुवाडी तालुका हा निसर्गसंपन्न तालुका आहे. इथं पावसाचे प्रमाण नेहमीच अधिक असते. पण याहीपेक्षा माणसाने निर्माण केलेल्या कारणांमुळे महापुराला निमंत्रण दिले जात आहे.

सगळ्यात पहिल्यांदा डोंगर कपारीतून वाहणाऱ्या ओढ्यांना, नदी पात्रांना वाहण्यासाठी जागा ठेवली नाही. अनेक ओढ्यांच्या पात्रात अतिक्रमणे होवून, सिमेंट च्या इमारती उभ्या राहिल्या. अनेक नदी पात्रांना कृत्रिम रित्या वळविण्याचा यशस्वी प्रयत्न केला गेला. त्यामुळे ओढे आणि नद्या पात्राबाहेर आल्या. पाण्याच्या पोटफुगीने नादिपात्रातील पाणी गावात घुसले.
दुसरे कारण अवैधरीत्या होत असलेली वृक्षतोड. या वृक्षतोडीला समाजातील काही घटक जबाबदार आहेत. या मंडळींवर प्रशासनाचा काही वचक आहे कि नाही ? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. शासन याकडे तितक्या गांभीर्याने पहात नाही.

तिसरे कारण म्हणजे जमिनीची होणारी धूप कशी थांबविली पाहिजे , याबाबत कोणतेही मार्गदर्शन होत नाही. दिवसेंदिवस वाढत असलेले तापमान , आणि त्यामुळे होणारी जमिनीची धूप यामुळे डोंगर खिळखिळे होवू लागले आहेत. जमिनीला धरून ठेवणारी माती आणि झाडे यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.

याकडे प्रशासन आणि समाज या दोघांनीही तितक्याच गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. अन्यथा महापूर दरवर्षी येणार आणि असेच लोकांचे संसार उध्वस्त होत राहणार, याशिवाय पर्याय नाही.