मानोली इथं पत्र्याच्या पेटीत अज्ञात महिलेचा मृतदेह : आंबा पंचक्रोशीत खळबळ
आंबा विशेष प्रतिनिधी ( दशरथ खुटाळे ) : मानोली तालुका शाहुवाडी येथील धरणाच्या मागील बाजूस एका अज्ञात महिला मृतदेह पत्र्याच्या पेटीत आढळून आला आहे. हि घटना आज दि.२० मार्च रोजी दुपारच्या दरम्यान उघडकीस आली आहे.

आंबा तालुका शाहुवाडी हा भाग पर्यटनस्थळ म्हणून पुढे येत आहे. मानोली धरण हे आंब्यापासून केवळ दीड ते दोन किलोमीटर अंतरावर आहे. या धरणाच्या मागील बाजूस रस्त्यापासून २०० मीटर अंतरावर एका पत्र्याच्या पेटीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला.

दरम्यान सदरच्या महिलेचा सुमारे सात ते आठ दिवसांपूर्वी गळा आवळून खून करण्यात आला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महिलेचे वय अंदाजे ३० ते ३२ वर्षे असावे. अशी माहिती पोलीस सूत्रांकडून समजते.

सदरच्या घटनेमुळे आंबा पंचक्रोशीत खळबळ माजली आहे. घटनास्थळी शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी तातडीने भेट दिली आहे. अधिक तपास श्री. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाहुवाडी पोलीस करीत आहेत.