मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींची गर्दी दाखला मिळवण्यासाठी
शिराळा प्रतिनिधी (संतोष बांदिवडेकर): लाडकी बहिण म्हणून शासकीय मदत मिळविण्यासाठी लागणारे दाखले संकलित करण्यासाठी शिराळा तहसील आवारात तलाठी तसेच सेतू कार्यालयात महिलांची झुंबड उडाली असून, याचा फायदा घेउन मोठ्या प्रमाणावर दलालाकडून सामान्य महिलांची लुबाडणूक सुरू आहे.
प्रशासनाने अर्ज केल्यानंतर ४८ तासात उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगितले जात असले तरी, मुदतीत दाखले मिळतीलच, याची शाश्वती नसल्याने महिला वर्ग अस्वस्थ झाला आहे.
राज्य शासनाने २१ ते ६५ वयोगटातील महिलांना मासिक १५०० रूपये देण्याची लाडकी बहिण योजना जाहीर केली असून, यासाठी उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, आधार कार्ड, जन्मतारीख दाखला आदी कागदापत्रासह संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची ३१आँगस्ट ही अंतिम तारीख दिली आहे. अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असली तरी, पहिल्या दिवशी बहुसंख्य महिलांना याची माहिती नव्हती. मंगळवार पासून मात्र, तलाठी व सेतू कार्यालयात दाखले मिळविण्यासाठी झुंबड उडाली आहे. या संधीचा फायदा घेत अनेक दलाल कार्यरत झाले असून, प्रति दाखला २० रूपये दर असताना निकड पाहून मनमानी दर आकारणी करून मध्यस्थ मालामाल होत आहेत. या शिवाय अर्ज भरून देण्यासाठी प्रत्येकी पन्नास रूपये दर आकारण्यात येत आहे.
अनेक महिला साक्षर असूनही चुकीमुळे मिळणारी मदत नाकारली जाण्याचा धोका स्वीकारण्यास तयार नाहीत. यामुळे मागणी अर्ज लिहून देणार्यांचीही शिराळा तहसील परिसरात गर्दी झाली आहे. दाखल्यासाठी महिलांच्या मुसळधार पावसात देखील रांगा सकाळ पासूनच लागल्या होत्या. दाखले मिळविण्यासाठी महिला वर्गाची झुंबड उडाली.