मुसळधार पावसामुळे चांदोली धरण क्षेत्रातून ९४४८ क्युसेक पाण्याचा विसर्ग
शित्तूर-वारुण विशेष (दशरथ खुटाळे ) : शाहुवाडी तालुक्याच्या उत्तर भागास पावसाने झोडपून काढल्यामुळे चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याचा विसर्ग वाढला आहे.
चांदोली धरणाच्या सांडव्यातून व वीज निर्मिती केंद्रातून ९४४८ क्युसेक पाणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे वारणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. वारणा नदीवरील आरळा – शित्तूर पुलावर वारणेच्या पुराचे पाणी काही प्रमाणात आले आहे.

चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २४ तासात १३८ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे पाणलोट क्षेत्रातून १८ हजार ८८ क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने, पाणी साठ्यात कमालीची आवक होत आहे.वारणा नदीकाठच्या क्षेत्रात पाणी झपाट्याने वाढत असून, पात्राशेजारील असलेला ऊस पाण्यात गेला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास शित्तूर, आरळा, चरण, सोंडोली हा पूर्ण भाग पाण्याखाली जाणार असून, कानसा खोऱ्यातील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे चांदोली धरण प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.