यंदा सात लाख टन गाळप उद्दिष्ट तर ; मागील हंगामातील उसास प्रती टन अर्धा किलो साखर दिवाळी भेट देणार : अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक
शिराळा / प्रतिनिधी :(संतोष बांदिवडेकर)
यावर्षी विश्वास कारखाना सात लाख टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवून, या हंगामात गाळप करणार आहे. चालू वर्षी पाऊसमान कमी झाल्याने, त्याचा परिणाम ऊसाच्या सरासरी उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट व ऊस उत्पादनाबरोबरच त्याचा एकूण टनेजवर परिणाम होणार आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्याला प्रोत्साहन देणे, व त्याच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विश्वास कारखाना अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
चिखली तालुका शिराळा येथील विश्वासराव नाईक साखर कारखाना ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ भागवताचार्य परमपूज्य सद्गुरु हरिभाऊ जोशी (नीटूरकर महाराज, हैदराबाद) यांच्या शुभहस्ते व कारखान्याचे अध्यक्ष आ.मानसिंगराव नाईक यांच्या व संचालकांच्या प्रमुख उपस्थित गव्हाणीत मोळी टाकून शुभारंभ करण्यात आला. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील सरूडकर, कारखान्याचे संचालक विराज दादा नाईक, ज्येष्ठ संचालक दिनकर पाटील, विजयराव नलवडे, सम्राट सिंह नाईक, राजेंद्रसिंह नाईक, विश्वास कदम उपस्थित होते.
आ.नाईक पुढे म्हणाले कि, १६ फेब्रुवारी नंतर कारखान्याला ऊस पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना एफ आर पी पेक्षा शंभर रुपये ज्यादा दर देणार व विविध प्रोत्साहन योजनांची घोषणा करण्यात आली. तसेच मागील हंगामातील कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्र बाहेरील शेतकऱ्यांच्या ऊसास प्रति टन अर्धा किलो साखर, कारखाना ऊस उत्पादकांना दिवाळी भेट म्हणून देणार असल्याचे अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक यांनी संगितले.
अध्यक्ष नाईक पुढे म्हणाले की, कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने विश्वास कारखान्याने विस्तारीकरण हाती घेतले आहे. विश्वास कारखाना यावर्षीच्या हंगामात सात लाख टन एवढे गाळपाचे उद्दिष्ट आहे.
ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना बक्षीस योजना :
यावर्षी ऊसाच्या उत्पादनात घट झाल्यामुळे शेतकऱ्यांना प्रती टनाला 16 फेब्रुवारी नंतर येणाऱ्या ऊसास शंभर रुपये प्रती टन दर, एक मार्च नंतर येणाऱ्या उसाला दोनशे रुपये, याशिवाय 24 मार्च नंतर येणाऱ्या 50 टनाच्या वरील उसाचे तीन विजेते काढणार असून, पहिला क्रमांक दहा ग्रॅम सोन्याचे तीन विजेते, तसेच 40 टन ते 49 टन पर्यंत येणारा ऊसाचे पुरवठा करणाऱ्यांना पाच ग्रॅम सोने, तसेच 30 टन ते 39 टन तीन तीन विजेत्यांना ग्रॅम सोने, 20 टन ते 29 टन दोन ग्रॅम सोने अशी तीन अजून वेगळी बक्षीस काढण्यात येणार आहेत.
आ. नाईक म्हणाले,एक मार्च नंतर कारखान्यास येणाऱ्या उसाकरिता प्रोत्साहन म्हणून ही योजना राबविण्यात येत आहे. विश्वास कारखान्यास ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने या बक्षिसांची घोषणा करण्यात येत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी केले. या बक्षिसाचे मानकरी होण्यासाठी शेतकऱ्यांनी कारखान्याकडे नाव नोंदणी करणे गरजेचे आहे.
कार्यक्रमास संचालक यशवंत निकम, सुहास घोडे-पाटील, सुरेश पाटील, यशवंत दळवी, विश्वास पाटील, कार्यकारी संचालक अमोल पाटील, सचिव सचिन पाटील, डिस्टिलरी इन्चार्ज युवराज गायकवाड सर्व खाते प्रमुख अधिकारी उपस्थित होते.