योगीराज सरकार यांच्या मनगटी घड्याळ : योगीराज यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील स्व.आम. संजयसिंह गायकवाड दादा यांचे सुपुत्र योगीराजसिंह गायकवाड सरकार यांनी काल ” विजयादशमी ” च्या मुहूर्तावर मनगटी घड्याळ बांधून, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आपल्या कार्यकर्त्यांसहित प्रवेश केला आहे. यावेळी ग्रामविकासमंत्री नाम. हसन मुश्रीफ यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी बोलताना नाम.मुश्रीफ म्हणाले कि, योगीराजसिंह सरकार यांचा प्रवेश पक्षाला बळकटी मिळवून देणारा आहे. यामुळे स्व. संजयदादा यांच्या कामाची पुनरावृत्ती योगीराज यांच्या माध्यमातून आपल्याला पहावयास मिळणार आहे. योगीराज यांच्या पाठीशी आम्ही हिमालयासारखे उभे राहणार आहोत.

यावेळी बोलताना योगीराज सरकार म्हणाले कि, स्व. आम. संजयदादा यांच्या निधनानंतर तालुक्यातील जनता पोरकी झाल्यासारखी होती. यापुढे मुश्रीफ साहेब यांच्यावर विश्वास ठेवून दादांच्या कामाची पद्धत पुन्हा एकदा जनतेला दिसल्याशिवाय राहणार नाही. मागील झालेल्या चुका दुरुस्त करून, पुनश्च तालुक्याला संजयदादांचे प्रतिरूप पहायला मिळेल, याची ग्वाही देतो.

त्याचबरोबर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा पवारसाहेब, खासदार सुप्रिया सुळे ताई,अजित दादा, नाम. मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार तालुक्यात जनतेचं ” हक्काचं माणूंस ” तयार होईल, याची खात्री देतो.
यावेळी त्यांच्यासोबत उत्तम पाटील, विद्यानंद यादव, विजय पाटील थेरगाव, संदीप केमाडे, शिवाजी गावडे, सुभाष पाटील पिशवी, सुभाष कांबळे, बाबू कांबळे, रावजी कांबळे, भास्कर कांबळे, अजित पिंपळे, प्रमोद घाडगे, सागर आळवेकर, भाऊसाहेब घाडगे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.