रेशन दुकानदारांच्या खांद्यावर शासनाची बंदूक- उग्र आंदोलनाचा इशारा : श्री ठमके, भाग-१
शाहुवाडी :: शासनाने प्राधान्य रेशनकार्ड धारकांकडून हमीपत्र भरून घेण्याचे आदेश काढले आहेत. याद्वारे रेशनकार्ड धारकांना कागदात पकडून त्यांचे रेशन बंद करण्याचा घाट शासन घालीत असल्याचे निदर्शनास येत आहे. हे आदेश त्वरित न थांबविल्यास, सर्वसामान्य रेशनकार्ड धारकांसह सर्व रेशन दुकानदार यांच्यावतीने उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कोल्हापूर जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचे उपाध्यक्ष गामाजी ठमके यांनी दिला आहे.

याबाबत पत्रकारांशी सविस्तर बोलताना श्री ठमके म्हणाले कि, शासनाने प्राधान्य रेशनकार्ड धारकांना हमीपत्र भरून देण्याचे आदेश दिले आहेत. या हमीपत्रात रेशनकार्ड धारकांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ४४ हजाराच्यावर असता कामा नये. तसेच त्या कार्ड धारकाकडे गॅस जोडणी असता कामा नये, असे असल्यास, त्यांचे नाव प्राधान्य रेशनकार्ड यादीतून कमी करण्यात येईल, अशा जाचक अटी कार्ड धारकांवर लावल्या आहेत.

दरम्यान प्राधान्य रेशनकार्ड म्हणजे ज्यांचे अत्यल्प उत्पन्न गटात नाव आहे. ज्यांना २ रुपये दराने रेशन मिळते. अशांचे रेशन या नियमानुसार बंद होणार आहे. दरम्यान शासनानेच उज्वल गॅस योजनेच्या माध्यमातून, घरोघरी गॅस पोहचविण्याचे अभियान राबविले आहे, आणि तेच शासन आत्ता गॅस जोडल्यास प्राधान्य रेशन धान्य मिळणार नाही, असा फतवा काढीत आहे. हि पद्धत म्हणजे सर्व सामान्य जनतेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिल्याची पद्धत आहे.

सध्याच्या परिस्थितीत वार्षिक ४४ हजारपेक्षा कमी उत्पन्न शक्यतो पहायला मिळणार नाही. तसेच हे वार्षिक उत्पन्न संपूर्ण कुटुंबाचे मिळून असले, तरीही ते कार्ड रद्द होणार आहे. यामध्ये सर्वसामान्य शेतकरी भरडला जाणार आहे. कारण शेतकऱ्याने फक्त दोन लिटर दुध जरी डेअरीला घातले, तरी त्याचे वार्षिक उत्पन्न ४४ हजारापेक्षा अधिक होते. सध्याच्या महागाईच्या काळात ४४ हजार हि रक्कम अतिशय तुटपुंजी आहे. असे असतानाही शासन, हि अट लावणार असेल, तर तो सामान्य शेतकऱ्यावर अन्याय होणार आहे.


तेंव्हा सदरचे हमीपत्र रद्द व्हावे, अन्यथा रेशन दुकानदारांसहित रेशन कार्ड एकत्र येवून उग्र आंदोलन करणार आहोत, असा इशारा कोल्हापूर रेशन दुकानदार संघटनेचे उपाध्यक्ष गामाजी ठमके यांनी दिला आहे.