वडगाव, शिंपे, सरूड, शिवारे परिसरात बिबट्याची दहशत : वासरू आणि शेळीचा वडगावात बळी
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील वडगाव इथं दि. २० जुलै रोजी रात्रीच्या दरम्यान बिबट्याने एक शेळी आणि एका वासराचा जीव घेतला आहे. या घटनेचा प्रशासन गांभीर्याने विचार करणार आहे का ? असाच प्रश्न येथील जनतेला पडला आहे.


सरूड, वडगाव, शिंपे , शिवारे परिसरात बिबट्याने दहशत माजवली आहे. गेली दहा दिवस या परिसरात बिबट्याने उच्छाद मांडला आहे. याबाबत नेमकी वनखात्याची भूमिका काय हा मोठा प्रश्न आहे. या दहशतीसंदर्भात ग्रामपंचायत किती दक्ष आहेत, हे माहित नाही. परंतु याबाबत सरूड गावाच्या सरपंच सौ राजकुवर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत वनखात्याला कळवले असल्याचे सरपंच यांनी सांगितले. आणि गरज भासल्यास तशा आशयाचा ठराव करणार असल्याचे देखील सरपंच पाटील यांनी सांगितले.

वडगाव येथील शेकाप चे भाई भारत पाटील यांनी देखील वनखात्याच्या उदासीनतेबाबत नाराजी व्यक्त केली. तर ग्रामपंचायत गरज भासल्यास ठराव करणार असल्याचे सांगितले. पण काही ग्रामपंचायत मात्र स्वत: चा अहम पणा धरून बसले आहेत. त्यांच्या गावातील पशुधन आणि ग्रामस्थ यांचे रक्षण कोण करणार ? याबाबत प्रश्न निर्माण झाल्याचे ग्रामस्थांतून समजते.

दरम्यान बिबट्याच्या बंदोबस्तासाठी काय उपाय केले आहेत, याचा खुलासा वनखात्याने करावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.