वडिलांची काळजी केली,अन, गुन्हा दाखल….
बांबवडे : एका वेड्या मुलानं आपल्या वडिलांना ते आजारी असल्यानं, त्यांची शुश्रुषा करण्यासाठी आपल्या घराकडं आणलं. तसं सामाजिकदृष्ट्या पाहिलं, तर हि गोष्ट चुकीची आहे, असं जर कोण म्हटलं, तर ते मानवतेच्या विरोधात होईल. एका मुलानं आपल्या वडिलांची काळजी करू नये का ? तर नक्की करायलाच पाहिजे. परंतु हि गोष्ट सध्याच्या काळात गुन्हा ठरली. कारण काळ कोरोना संक्रमणाचा आहे. जिल्हाबंदी आहे. होय. पण ते वडील आहेत. आजारी आहेत. हि बाब माणुसकी ची होत नाही का ? माणुसकी पेक्षा कायदा श्रेष्ठ आहे. यासाठी अति तत्परतेने पदाधिकाऱ्यांनी पोलिसात फिर्याद दिली. आणि काय ते कायद्याचे पालन केले. खरोखर हि तत्परता वाखाणण्यासारखी आहे. पण अशी तत्परता किती घटनांमध्ये पाहायला मिळते. दोन दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्यानं रस्त्यात ट्रक बाजू-बाजूला लावून उभा केला होता, त्यामुळ ट्रॅफिक जाम झालं होतं. आणि त्यांचा चालक सुद्धा प्रवाशाशी मग्रुरीत बोलत होता. हे ट्रॅफिक जाम नेहमीच होत असतं. त्यावेळी आमचे पदाधिकारी किती तत्परतेने पुढे आले? हा प्रश्न विचाराधीन राहील. याबाबत सुद्धा पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवावा. व्यापाऱ्यांच्या मग्रूर चालकांबाबत सुद्धा फिर्याद द्यावी, अशी माफक अपेक्षा एखाद्या नागरिकानं केल्यास त्यास न्याय दिला जाईल का ? असो, अनेक व्यापारी अर्ध्या शटर च्या खालून लाखो रुपयांच्या मालाची विक्री करतात. आणि किरकोळ व्यापारी मात्र लॉकडाऊन च्या नावाखाली धंदा बंद करून असतात.हे अन्यायी नाही का? अशावेळी पदाधिकारी जातात कुठे ? असो, पण कायदा आणि नातं यामध्ये नातं श्रेष्ठ ठरलं. पोलिसातील फिर्याद आणि त्यावर उठलेल्या बातम्या, खरोखरच सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देतात. पण नेहमीच असं घडावं,अशी अपेक्षा राहील. कोकरूड पुलावरून अनेकवेळा जिल्हाबंदीची उडवलेली खिल्ली, आमच्या बांधवांना किती दिसली, हे समजलं नाही.
कोरोना हे निमित्त आहे. कोळेकर यांच्या वडिलांना आजारी असल्यानं, आणलं गेलं. त्यावेळी ते पॉझीटिव्ह नव्हतेे. याची नोंद, फिर्याद देणाऱ्या आणि त्यांना उठवून बसवणाऱ्या मंडळींना का कळली नाही ?, कि आपला तो ” बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट ! “
समाज नेहमी निरपेक्ष डोळ्यांनी पाहावा. आज समाजातील आई-वडिलांबाबत मुलांचं प्रेम कमी होत आहे. मूलं आई-वडिलांना विचारात नाहीत. अशा काळात एका लेकानं आपल्या ‘ बा ‘ ची काळजी घेतली, हि सगळ्यात स्पृहणीय बाब आहे. भले, त्याच्यावर गुन्हा दाखल केला असेल, पण असले अनेक गुन्हे पाठीवर मारून फिरण्याची हिम्मत दाखवणारा मुलगा, त्या वडिलांसाठी निश्चितच अभिमानाचा ठरेल. एवढं पुरे.