विश्वनाथ पाटील कर्मयोगी व्यक्तिमत्व
बांबवडे : शाहुवाडी तालुका को-ऑप क्रेडीट सोसायटी मुंबई चे चेअरमन तथा शाहुवाडी तालुका युथ ऑर्गनायझेशन चे खजिनदार श्री विश्वनाथ सखाराम पाटील रहाणार सोनवडे तालुका शाहुवाडी यांचा निवृत्त सोहळा दि.५ ऑक्टोबर २०२५ रोजी संपन्न होत आहे. त्यांच्या या निवृत्त सोहळ्यानिमित्त साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स,एसपीएस न्यूज, दै. किल्ला या वृत्तपत्र समूहाच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा .
श्री विश्वनाथ सखाराम पाटील ( बापू ) हे एक लाघवी व्यक्तिमत्व आहे. या व्यक्तिमत्वाने त्यांच्या नोकरीच्या काळात अनेकांना मदतीचा हात दिला. विश्वनाथ पाटील हे केंद्रीय लोकनिर्माण विभाग या शासकीय विभागात वरिष्ठ नक्षा नवीस या पदावर कार्यरत होते. सुमारे ३९ वर्षे त्यांनी या कार्यालयात नोकरी केली. नोकरीत असताना देखील सहकार्य आणि सहकार या गोष्टी ते कधी विसरले नाहीत. तालुक्यातील कोणीही मुंबई येथील डीलाईल रोड या परिसरात गेले कि, त्याचं स्वागत आणि त्यांना आवश्यक असलेली गोष्ट, आणि त्यांना मिळवून देण्याचं काम श्री विश्वनाथ बापू यांनी केलं.
शाहुवाडी युथ ऑर्गनायझेशन आणि त्यांचे सहकारी श्री सुभाष कोकाटे, विश्वनाथ पाटील आणि शिवाजी कोल्हापुरे हे तिघेही तालुक्यातील सर्व सामान्य माणसांसाठी आपला वेळ देत होते. मुंबई सारख्या ठिकाणी पाच मिनिटांचा वेळ सुद्धा कोणाकडे नसतो.कारण नोकरी , लोकल ट्रेन चा प्रवास यामध्येच माणूस मेटाकुटीला आलेला असतो. परंतु या ऑर्गनायझेशन चे दोन फलंदाज मात्र कितीही थकून आलेले असले तरी, सर्व सामान्य माणसांसाठी त्यांनी आवर्जून वेळ काढला. आणि त्या माणसाला सहकार्यच केले. अनेक वेळा पदरच्या खिशात हात घालून दुसऱ्याला मदत करण्याचा त्यांचा स्वभाव हा त्यांच्या आई-वडिलांची दानत आणि गावच्या मातीची किंमत दाखवून देत होता. सा. शाहुवाडी टाईम्स ला सुद्धा मुंबई मध्ये रुजविण्याचे काम या दोन फलंदाजांसह शाहुवाडी युथ ऑर्गनायझेशन ने केले. याबद्दल सा. शाहुवाडी टाईम्स हे त्यांचे नेहमीच ऋणी राहणार आहे. कधीही एका रुपयाला कोणाला तसदी न देता, या जोडगोळी ने आपलं अस्तित्व तिथं जपलं. आणि बांबवडे, सोनवडे, शित्तूर तर्फ मलकापूर या पंचक्रोशीतून आलेल्या माणसाला किंमत देत, समाजकार्य केलं. केवळ गावचंच नव्हे, तर मुंबईतील राज्यकर्त्यांना सुद्धा या जोडगोळीने त्यांच्या कर्मभूमीत मानाचं स्थान दिले. तिथेही त्यांनी सहकार्याचे काम केले.
मुंबईत राहून गावाकडील विकासकामांचा पाठपुरावा केला. मंत्रालय स्तर असू दे , किंवा आमदार निवास असू दे, याठिकाणी अनेक विकासकामांचा पाठपुरावा करीत ती कामे मंजूर करण्यासाठी या जोडगोळीचा फार मोठा सहभाग होता. लोकांना विकासकामे दिसली, परंतु ती साकारण्यासाठी परिश्रम घेणारे मधले दुवे कधी दिसले नाहीत. श्री विश्वनाथ पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी देखील प्रसिद्धी ची कधीच अपेक्षा ठेवली नाही.
असं हे व्यक्तिमत्व ३० सप्टेंबर २०२५ रोजी निवृत्त झाले. आणि आपल्या मायभूमीला वंदन करण्यासाठी सोनवडे या जन्मभूमीत आले आहे. म्हणूनच या व्यक्तिमत्वाने आपल्या आयुष्यात जे कमावले ते आर्थिकमानात भले मोजता आले नाही, म्हणूनच त्यांच्या निवृत्तीचा सोहळा हा खऱ्या अर्थाने एका कार्यकर्त्याच्या आयुष्याची गोळाबेरीज म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यामुळे लोक सहभागात त्यांची किंमत फार मोठी आहे.पंचक्रोशीतील अनेक विकासकामांमध्ये त्यांचा सहभाग फार मोठा आहे. याबद्दल त्यांचे करावे तितके कौतुक थोडेच आहे. अशा या कर्मयोगी व्यक्तिमत्वाला लाख लाख सलाम.