शासनाने रद्द केलेली कामे त्वरित करावीत,व ओला दुष्काळ जाहीर करावा, यासाठी ४ नोव्हेंबर ला ” रास्ता रोको “
बांबवडे प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील शेतीची दयनीय अवस्था, रस्त्यांची झालेली दुर्दशा, शासनाने तालुक्यातील रद्द केलेली विकासकामे, पुन्हा मार्गी लावावी, अशा अनेक मागण्यांसाठी माजी आमदार सत्यजित पाटील शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस चे मानसिंगराव गायकवाड यांच्या युतीच्या वतीने ४ नोव्हेंबर २०२२ ला मलकापूर तालुका शाहुवाडी येथील विठ्ठल मंदिराच्या मागे सकाळी ११.०० वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मलकापूर इथं जमावे, असे आवाहन युतीच्या वतीने करण्यात आले आहे. तशा आशयाचे निवेदन माजी आरोग्य सभापती हंबीरराव पाटील ( बापू ), पंचायत समिती सभापती विजयराव खोत, राष्ट्रवादी चे जिल्हा परिषद सदस्य विजयराव बोरगे पैलवान,माजी पंचायत समिती सदस्य जालिंदर पाटील यांनी तहसीलदार गुरु बिराजदार यांना दिले आहे.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे कि, सध्या सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याच्या काळात परतीच्या पावसाने धिंगाणा घातला.यामध्ये शेतकऱ्यांची भात, सोयाबीन सारखी पिके जमीनदोस्त झाली आहेत. राज्यात अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. तेंव्हा शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा.

तसेच जि शेतकरी मंडळी आपली कर्जे वेळेवर परत करतात, त्यांना जाहीर केलेला ५००००/- रु. चा प्रोत्साहन अनुदान शासनाने जाहीर केले होते, पण त्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही शासनाकडून झालेली नाही. ती कार्यवाही त्वरित करून त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान त्वरित मिळावे. तसेच जि शेतकरी मंडळी आपल्या शेती च्या उत्पन्नातून आयकर भरतात. त्या शेतकऱ्यांची नावे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांची नावांच्या यादीतून वगळली आहेत. त्यांची नावे त्या यादीत पुन्हा समाविष्ट करावीत.
राज्यातील गोरगरीब जनतेला दिवाळीची भेट म्हणून आनंदाचा शिधा जाहीर केला होता. तो शिधा दिवाळी संपून सुमारे दहा दिवस झाले तरी अद्याप मिळालेला नाही. हि जनतेची शुद्ध फसवणूक आहे.

राज्यातील २० पट पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याची घोषणा शासनाने केली. यामध्ये शाहुवाडी तालुक्यातील डोंगरी भागातील ९२ शाळांचा समावेश आहे. शाहुवाडी तालुका मुळात दुर्गम आहे. यामध्ये शासनाने जाहीर केलेली हि भूमीका ग्रामीण भागातील जनतेच्या भावी आयुष्याला म्हणजेच त्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचाच हा प्रकार आहे. त्यामुळे हा निर्णय बदलावा.

शासनाने अनेक योजना, विकासकामे रद्द केल्याने ३०५४ , ५०५४ योजनेतील गरजेची असलेली अनेक कामे रद्द केली आहेत. संबंधित विभागाने कोणाच्या आदेशाने हि विकासकामे रद्द केलीत, याची माहिती द्यावी. महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नांतून मंजूर केलेली जनतेच्या हिताची शाहुवाडी तालुक्यातील रस्त्यांची कामे , ग्रामसडक योजनेतील कामे रद्द केलीत, ती त्वरित सुरु करावीत.

या सगळय गोष्टी हेतुपुरस्सर केल्या आहेत. तेंव्हा या सगळ्या कामांची त्वरित पूर्तता व्हावी. यासाठीच हा रास्ता रोको आंदोलन जाहीर करण्यात आला आहे. यासाठी जनतेने या आंदोलनात सहभागी व्हावे ,असे आवाहन देखील आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.