शाहुवाडीतून अधिकाऱ्यांसह वैज्ञानिक सुद्धा निर्माण व्हावेत – माजी आम. बाबासाहेब पाटील सरुडकर
येळवण जुगाई प्रतिनिधी : विद्यार्थ्यांनी जगातील नाविण्यपूर्ण गोष्टींकडे चमत्कार म्हणून न पाहता , वैज्ञानिक दृष्टीकोनातून पहावे. विज्ञानाचा अविष्कार करावा. डोळसपणे विज्ञानाकडे पहावे. यातूनच वैज्ञानिक , संशोधक निर्माण होतील, आणि देशाचे नाव जगात अभिमानाने घेतले जाईल , असे कर्तुत्व करावे , असे मत प्रतिपादन माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर यांनी केले.

येळवण जुगाई तालुका शाहुवाडी इथं ” अटल लॅब ” चे उद्घाटन संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना,त्यांनी वरील उद्गार काढले.

ते पुढे म्हणाले कि, जगातील विविध क्षेत्रात भारतीय विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जीवावर आपल्या देशाचे नाव कोरले आहे. विद्यार्थ्यांनी डोळसपणे विज्ञानाचा अंगीकार करावा.आज आपला देश स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. दरम्यान च्या काळात देशाने हरितक्रांती, धवल क्रांती सह विज्ञानात सुद्धा उत्तुंग भरारी घेतली आहे.
शाहुवाडी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर अधिकारी क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. याचबरोबर आपल्या तालुक्यातून वैज्ञानिक सुद्धा निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा आहे. असेही श्री पाटील म्हणाले.

मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक जुगाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य पी.एस. कुंभार यांनी केले. यावेळी तंटामुक्ती चे अध्यक्ष धोंडीबा कुडाळकर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमास उदय साखर चे संचालक राजाराम चव्हाण, संस्थेचे संचालक रामचंद्र पोवार, शाळा व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष विश्वास गुरव, देवस्थान समिती चे अध्यक्ष शरद कांबळे, अनिल भोसले, दशरथ घुरके, सत्यवान खेतल, सखाराम खेतल, अंगद खेतल मांजरे, गावचे तंटामुक्ती चे अध्यक्ष दिपक कांबळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.टी. लष्कर यांनी केले. तर आभार प्रदर्शन यु.डी. पोवार यांनी केले.