शाहुवाडी तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस
बांबवडे प्रतिनिधी ( दशरथ खुटाळे ): गेल्या दोन दिवसांपासून शाहुवाडी तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली असून, सगळ्याच शाहुवाडी तालुका परिसरात पावसाने ढगफुटी सारखा वर्षाव केला आहे. यामुळे काढणीला आलेल्या भात पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

गेल्या दोन दिवसांपासून शाहुवाडी तालुक्यात दुपारनंतर पाऊस आपली हजेरी लावत आहे.

यंदा पाऊस चांगल्या प्रमाणात झाला असल्याने, भात पिकं जोरदार आली आहेत. काही दिवसातच भाताची सुगी सुरु होणार असतानाच, पावसाने लावलेली हजेरी शेतकऱ्याच्या छातीत धडकी भरवत आहे. कारण यंदाचा समाधानकारक झालेल्या पावसाने पिके जोमाने आली आहेत. परंतु ऐन सुगीच्या तोंडावर सुरु झालेल्या पावसामुळे भात पिकं भुईसपाट होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

ऐन पावसाळ्यात न झालेल्या पावसापेक्षा जोरात पाऊस गेल्या दोन दिवस सुरु आहे. दुपारनंतर येणारा पाऊस ढगफुटी सदृश पाऊस होत आहे. रस्त्यावरून वाहणारे पावसाचे पाणी पाहता, ढगफुटी झाली का ? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.

पावसाची अशीच परिस्थिती राहिल्यास शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.