शाहुवाडी तालुक्यात पावसाची जोरदार मुसंडी
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यात पावसाने जोरदार मुसंडी मारली असून, वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला बर्की धबधबा पाहण्यासाठी गेलेले पर्यटक रस्त्यावर पाणी आल्याने अडकून पडले आहेत.

शाहुवाडी तालुक्यात पावसाने जोर धरल्याने, इथला शेतकरी वर्ग सुखावला आहे. मलकापूर च्या वरील भागात चिखल गुठ्ठा सुरु झाला असून , भात लावणीला वेग आला आहे. तसेच रताळी लावणीला सुद्धा चांगलाच प्रतिसाद मिळू लागला आहे.

तालुक्यातील पाझर तलावांनी तळ गाठला होता. त्यांना जीवनदान मिळाले आहे. पाझर तलाव एकाच पावसात भरून गेले आहेत. तर अनेक ओढ्यांमधून पाणी खळाळून वाहू लागले आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त केले जात आहे. ऊस पिकाला खताचा दुसरा डोस देण्यासाठी थांबलेला शेतकरी आत्ता खताचा डोस द्यायला तयार झाला आहे. पण खत विक्रेत्यांनी पुन्हा आडमुठे धोरण सुरु केले आहे. युरिया घेतला तर, त्याबरोबर दाणेदार सुद्धा घ्यावेच लागेल. अन्यथा युरिया मिळणार नाही. असे काहीसे घडत असल्याच्या तक्रारी शेतकरी मंडळींकडून ऐकावयास मिळू लागल्या आहेत.

एकंदरीत तालुक्यात उशिरा का होईना, पण पाऊस सुरु झाल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.