शाहुवाडी पोलीस ठाणे व महसूल प्रशासनाचा पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध
मलकापूर प्रतिनिधी : महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी स्थानिक पत्रकारांना तसेच माध्यम प्रतिनिधींना विशाळगड परिसरातील वार्तांकन करण्यास जावू न दिल्याने प्रशासनाचा शाहुवाडी तालुका पत्रकार संघ यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात झाला.
यावेळी अध्यक्ष आनंदराव केसरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी हा निषेध करण्यात आला. येथील शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय गरडे, तसेच येथील प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना स्थानिक पत्रकारांची ओळख असताना देखील या मंडळींनी पत्रकारांना गडावर जाण्यास मज्जाव केला. कोणत्याही परिस्थितीत पत्रकार मंडळी वार्तांकन करू शकतात. हा पत्रक्रांचा मुलभूत अधिकार आहे. कारण पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानाला जातो. त्यामुळे पत्रकारांना तेवढे महत्व घटनेने दिले आहेत.
१४ जुलै रोजी पोलिसांच्या गलथानपणामुळे तसेच बघ्याची भूमिका घेतल्यामुळेच जमावाकडून या हिंसक घटना घडल्या. जे आज पत्रकारांना अडवतात, त्यांनी त्यावेळी जर आंदोलकांना अडवले असते, तर हि परिस्थिती पहायला मिळाली नसती. आपला नाकर्तेपणा उघड होवू नये , हे लपवण्यासाठी पत्रकारांना अडवण्याचा घाट या पोलीस व महसूल प्रशासनाने घातला असावा, असेही पत्रकारांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले. यावेळी उपाध्यक्ष राजाराम कांबळे, कार्याध्यक्ष मुकुंद पवार, संतोष कुंभार, दशरथ खुटाळे, शाम पाटील, रमेश डोंगरे, विकास कांबळे आदी पत्रकार उपस्थित होते.