शाहुवाडी पोलीस ठाण्याची प्रशस्त इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत : इमारतीचे काम पूर्ण
बांबवडे : शाहुवाडी पोलीस ठाणे ची भव्य वास्तू उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या प्रशस्त वास्तूसाठी अनेक लोकप्रतिनिधींनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला होता. आणि निधी उपलब्ध करून दिला होता त्या अनुषंगाने पोलीस ठाणे ची इमारत उभी राहिली आहे.

एक काळ असा होता कि, केवळ २५ ते २७ पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांसह शाहुवाडी पोलीस ठाणे सांभाळत होते. त्यात अनेक वेळा इमारतीला गळती लागली असायची. अशा प्रतिकूल परिस्थितीत पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावले होते. त्या सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने हार्दिक अभिनंदन.

या प्रशस्त इमारतीबाबत शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले कि, शाहुवाडी पोलीस ठाण्याची नवी इमारत प्रशस्त आहे. पोलीस निरीक्षक, तसेच ठाणे अंमलदार यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था कक्ष निर्माण केला आहे. तसेच गोपनीय विभाग, वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र दालन निर्माण केले आहे. याच बरोबर शस्त्रागार, पोलीस कोठडी, गोपनीय विभाग, याचबरोबर संगणक कक्ष, माहिती विभाग अशी प्रत्येकासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.

प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सोयी सुविधा पुरविल्या कि, त्यांच्या कामांचा लवकर उरक होईल. त्याचबरोबर त्यांचा वेळ वाचल्यामुळे तो वेळ त्यांना तपासासाठी देता येईल. मागील काळात प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा पोलीस कर्मचाऱ्यांनी आपली सर्वोत्तम सेवा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. आत्ता तर प्रशस्त इमारत, सोयी सुविधा, स्वतंत्र कक्ष, आदी सुविधा मिळाल्या आहेत. त्या लवकरात लवकर कार्यान्वित व्हाव्यात, अशी अपेक्षा सामान्य जनतेची आहे. म्हणूनच या पोलीस ठाण्याच्या या प्रशस्त वास्तू चे लवकरात लवकर उद्घाटन करून, पोलीस कर्मचाऱ्यांना सुविधा पुरवाव्यात. जेणेकरून सामान्य जनतेला प्रशासकीय सेवा अधिक जलद रीतीने मिळेल.