शाहुवाडी वनाधिकारी व ठेकेदार याची चौकशी व्हावी- भारतीय दलित महासंघ
शाहुवाडी प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील कोतोली पैकी इंगवलेवाडी इथं बेकायादेशीररीत्या वृक्षतोड करणाऱ्या वनाधिकारी व ठेकेदारांवर कारवाई व्हावी, अशा आशयाचे निवेदन भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे यांच्याहस्ते तहसीलदार शाहुवाडी यांना देण्यात आले आहे.

सदरच्या वृक्षतोडीची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. प्रत्यक्षात मंजुरी पत्रावर वाळलेल्या झाडांसह पडलेल्या फांद्या तोडण्याची परवानगी असताना, ठेकेदारांनी मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेसुमार वृक्षतोड केली आहे.

वृक्षतोडीस प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने फेलिंग ऑफ ट्री रेग्युलेशन अॅक्ट१९६४ हा कायदा अस्तित्वात असताना देखील अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगनमताने आर्थिक हव्यासापोटी कायद्याची पायमल्ली केल्याचे स्पष्ट होत आहे. असेही निवेदनात नमूद केले आहे.

वनविभागाचे कायदे कडक असतानाही कोतोली पैकी इंगवलेवाडी इथं बेसुमार वृक्षतोड केली आहे. सदरच्या घटनेबाबत शासकीय अधिकारी व ठेकेदार यांच्यावर खातेनिहाय चौकशी देखील करण्यात यावी, अशी मागणी देखील या निवेदनाद्वारे श्रीकांत कांबळे यांनी केली आहे.