शित्तूर खोऱ्यातील जनसामान्यांचा चेहरा हरपला : रावसाहेब भोसले यांचे निधन
बांबवडे : स्व. आम. संजयसिंह गायकवाड दादा यांचे समर्थक रेठरे तालुका शाहुवाडी येथील रावसाहेब भाऊसाहेब भोसले (सरकार) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. दि.२० एप्रिल २०२० रोजी त्यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले आहे. सा. शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
सध्याची कोरोनाची पार्श्वभूमी पाहता सर्व विधी घरगुती पद्धतीने केले जातील. पाहुणेमंडळी, तसेच इष्टमित्र आणि आप्तेष्ट यांनी भेटण्यास येण्याची घाई करू नये. ज्यामुळे कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. यामुळे भेटण्यास येण्यासाठी, भोसले परिवाराकडून निश्चित वेळ कळविण्यात येईल. आपला ऋणानुबंध कायम राहवा, अशी विनंती भोसले परिवाराकडून करण्यात आली आहे.
स्व. रावसाहेब भोसले यांनी संजयदादांच्या माध्यमातून समाजकारण करण्यास सुरुवात केली. जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. त्यांनी गावामध्ये महिला दुध संस्था, सेवा सोसायटी निर्माण करून परिसरात सहकाराचे बीजारोपण केले. शेतीसोबत दुग्ध व्यवसायामार्फत जनसामान्यांचे आर्थिकमान उंचावण्याचे त्यांनी प्रयत्न केले होते. त्यांच्या या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपले नाव कमावण्याचा यशस्वी प्रयत्न केला. यामुळे शित्तूर तर्फ वारुण, भेंडवडे, वारूळ, आंबा, शिवारे, कापशी, रेठरे, माणगाव आदी परिसरात सामाजिक काम करून, स्व.संजयदादा यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला आहे. संजयदादा यांच्या घराण्यासोबत त्यांचे जवळचे संबंध आहेत. गावातील सेवा सोसायटी मध्ये सतत २५ वर्षे कार्यरत राहून सहकारामध्ये त्यांनी नावलौकिक कमावला आहे.
त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, असा परिवार आहे. त्यांच्या पश्चात त्यांची हि राजकीय आणि सामाजिक धुरा यापुढे सुरूच ठेवण्याचे काम, त्यांचे नातू भरतराज भोसले हे सांभाळणार आहेत, अशी माहिती भोसले परिवाराकडून देण्यात आली आहे.