शित्तूर तर्फ वारुण येथील निकृष्ट बांधकामाच्या निषेधार्थ शाहुवाडी इथं रास्ता रोको
शाहुवाडी प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ वारुण या गावातील दलित वस्ती योजनेतील काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. यासाठी येथील दलित समाजासह भारतीय दलित महासंघाच्या वतीने शाहुवाडी इथं रास्ता रोको करण्यात आला.. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी जिल्हापरिषद बांधकाम विभागाला निवेदन दिले. सदर चे निवेदन शाहुवाडी पंचायत समिती च्या बांधकाम विभागाचे खातेप्रमुख मंगेश कुडवी यांनी स्वीकारले.

यावेळी श्रीकांत कांबळे म्हणाले कि, २०१८ ते २०२१ दरम्यान झालेलली सर्व दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत कामे हि प्लॅन एस्टिमेट प्रमाणे झालेली नाहीत.तसेच हि कामे निकृष्ट दर्जाची झालेली असून, सदरच्या कामांची उच्च स्तरीय चौकशी व्हावी. त्याप्रमाणेच नेहमीच दलित वस्तीचा निधी इतरत्र वापरला जातो. परंतु शित्तूर वारुण इथं ज्या दलित वस्तीत हा निधी वापरला गेला, तोही निकृष्ट दर्जाचा आहे. सदरच्या कामाची त्वरितउच्च स्तरीय चौकशी करून , संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे ,अन्यथा दहा दिवसानंतर पुन्हा पंचायत समिती वर मोर्चा आणून उग्र आंदोलन करण्यात येईल. या कामात अधिकारी आणि ठेकेदार यांनी मिलीभगत केली असल्याचा संशय आहे.

दरम्यान पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे शाखा उपभियांता मंगेश कुडवी म्हणाले कि, आमच्या माहितीनुसार काम योग्य झाले आहे, तरीही नागरिकांच्या मागणीनुसार या कामाची उच्च स्तरीय चौकशी, क्वालिटी कंट्रोल विभागाच्या वतीने करण्यात येईल.

दरम्यान शित्तूर वारुण येथील हे रस्त्याचे बांधकाम ९६ मीटर चे असून ५ लाख रुपये खर्चाच्या किमतीचे आहे. या कामाचे अद्याप ग्रामपंचायत शित्तूर तर्फ वारुण ला हस्तांतरण करण्यात आलेले नाही. अशी माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान शाहुवाडी तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरु असलेल्या दलित वस्ती सुधार योजनेच्या कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. दोषी अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच दलित समाजाला आर्थिक हव्यासापोटी विकासापासून वंचित ठेवल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. अशा मागण्या भारतीय दलित महासंघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आले आहे.