शिराळा राष्ट्रवादी युवक च्या वतीने प्रकल्प राज्याबाहेर गेल्याबद्दल निषेध – विराज नाईक
शिराळा प्रतिनिधी : राज्य सरकार च्या नाकर्तेपणामुळे टाटा समूहाचा आणखी एक प्रकल्प गुजरात मध्ये गेल्यामुळे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस च्या वतीने सांगली जिल्ह्यातील शिराळा इथं आंदोलन करण्यात आले.


सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे अध्यक्ष विराज नाईक व माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. दरम्यान शिराळा तहसीलदार गणेश शिंदे यांना याबाबत चे निवेदन देण्यात आले.

निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे कि, महाविकास आघाडी सरकार ने राज्यात अनेक प्रकल्प आणले होते. त्यांच्या माध्यमातून राज्यात आर्थिक गुंतवणूक वाढ, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार होती. मात्र राज्यातील नव्याने आलेले शिंदे-फडणवीस सरकार च्या नाकर्तेपणामुळे अनेक प्रकल्प गुजरात राज्यात गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या रोजगार निर्मितीला चाप बसला आहे. यातून तरुण वर्गाचे फार मोठे नुकसान झाले आहे. अशा सरकार चा आम्ही निषेध करीत आहोत.


यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे तालुकाध्यक्ष हर्षद माने, शहर अध्यक्ष अमित गायकवाड, विनोद कदम व इतर सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य यांच्यासहित तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.