शिवकालीन मार्गात बदल झाल्यास आंदोलनाचा इशारा -नामदेव गिरी शिवसेना
बांबवडे :शाहुवाडी तालुक्यातून जाणाऱ्या ऐतिहासिक मार्गात अधिकारी वर्गाकडून बदल केला जात असल्याचे समजते. ऐतिहासिक मार्गात कोणताही बदल केला जावू नये, अन्यथा शिव भक्तांच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल . अशा आशयाचे निवेदन शिवसेनेच्या वतीने जिल्हा उप प्रमुख नामदेव गिरी आणि कार्यकर्ते यांनी शाहुवाडी पंचायत समिती चे गटविकास अधिकारी श्री मंगेश कुन्चेवार यांना देण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी कि, पन्हाळा गड ते विशाळ गड हा ऐतिहासिक मार्ग आहे. हा मार्ग खोत वाडी पैकी धनगर वाडा, म्हांडलाईवाडी, करपेवाडी पैकी धनगर वाडा, करपेवाडी, आंबेवाडी, कळकेवाडी, रींगेवाडी, माळेवाडी, सुका माळ, म्हाळसवडे, माणपैकी धनगर वाडा, पांढरे पाणी, पावनखिंड, हा ऐतिहासिक मार्ग आहे. हा मार्ग शासन तयार करीत आहे. म्हांडलाईवाडी पर्यंत काम पूर्ण झाले आहे. या पुढील मार्गात शासन बदल करीत असून करपे वाडी पैकी धनगर वाडा वगळून चुकीच्या व वेगळ्या मार्गाने हा ऐतिहासिक मार्ग नेण्याचे धोरण शासन आखत असून, चुकीचा इतिहास जगासमोर मांडण्याचे काम शासन करीत असल्याचे समजते . तशा आशयाचे लेखी पत्र बांधकाम विभागाने ग्रामपंचायत आम्बर्डे यांना दिले आहे.सदर च्या रस्त्यामध्ये करपेवाडी पैकी धनगर वाडा हे काही लोकांच्या स्वार्थापोटी वगळण्याचे धोरण शासन आखत असल्याचे समजते. असे झाल्यास तमाम शिव भक्तांमध्ये असंतोष पसरणार आहे.
सदर रस्त्याचे काम ऐतिहासिक शिवकालीन मार्गानुसारच व्हावे. अशी तमाम शिव भक्तांची अपेक्षा आहे. सदर तयार होणाऱ्या रस्त्याची त्वरित चौकशी व्हावी. हे काम शिवकालीन मार्गानुसार न झाल्यास ,तमाम शिवभक्त यांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, अशा आशयाचा इशारा सुद्धा या निवेदनात देण्यात आला आहे.