शिवसेनेत सत्तेपेक्षा सेवा महत्वाची- माजी मंत्री श्री दिवाकर रावते
बांबवडे : ” त्याग म्हणजे काय असतं ” ,हे सांगणारी संघटना म्हणजे शिवसेना. ह्या शिवसेनेत स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांवर सत्तेपेक्षा सेवा महत्वाची असते. असे संस्कार रुजवलेले आहेत. शिवसैनिक घडविताना घाव घातल्याशिवाय ते घडविता येत नाही, हे वेळोवेळी सांगितले आहे. म्हणूनच गावातल्या प्रत्येक माणसाला गावातील शिवसेना हि सेवा करणारी आपली हक्काची संघटना आहे. असे वाटले पाहिजे, असे मत माजी परिवहन मंत्री श्री दिवाकर रावते यांनी यावेळी व्यक्त केले.

बांबवडे तालुका शाहुवाडी येथे शिवसमर्थ मंगल कार्यालय इथं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकी मध्ये अध्यक्षस्थानी माजी परिवहन मंत्री श्री दिवाकर रावते होते.

यावेळी संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवाडकर आणि दिवाकर रावते यांनी शाहुवाडी आणि पन्हाळा तालुक्यात विभागप्रमुख, गटप्रमुख, आणि शाखा यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी श्री रावते पुढे म्हणाले कि, आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात रात्रंदिवस या महामारीला घालवण्यासाठी अविरतपणे काम केले आहे. म्हणूनच त्यांचे नाव जागतिक दर्जापर्यंत पोहचले आहे. शिवसैनिक कधीही मरणाला भीत नाही, आणि हेच संस्कार शिवसेनेने आपल्या कार्यकर्त्यांवर केलेले आहेत. दरम्यान वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. परंतु तळागाळातील विभागप्रमुख, गटप्रमुख, यांनी काय केले पाहिजे, यासाठी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कधी बैठक लावलेली दिसत नाही. यावेळी या दोन तालुक्यातील शिवसेनेची परिस्थिती ‘ ‘ आधी कळस , मग पाया ‘ अशी झाल्याने, शिवसेना रुजण्यास कमी पडली आहे. यासाठी पहिल्यांदा पाया भक्कम केला पाहिजे , आणि नंतरच कळस चढविला पाहिजे. शिवसेनेत ८० % समाजकारण करून, त्यानंतर २०% राजकारण साधलं गेलं पाहिजे, असा शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचा दंडक आहे. दरम्यान असं काम करा , कि आपणच जिंकू , पडणारा पडेल, त्याची काळजी करू नका. यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने आठवड्यातील फक्त दोन दिवस समाजकारणासाठी दिले पाहिजेत, असेही माजी परिवहन मंत्री रावते यांनी सांगितले.

यावेळी शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील (आबा ) म्हणाले कि, आपल्या मतदारसंघात जर पक्षाची ताकद वाढवायची असेल, तर प्रत्येकाने व्यवस्थितपणे आपले काम केले पाहिजे. शिवसेना लोकांच्या घराघरात पोहचली पाहिजे, म्हणजे सेनेचे काम सगळ्या पर्यंत पोहोचावे , यासाठी शिवसैनिकाने पुढे झाले पाहिजे. दरम्यान हि बैठक पदाधिकारी सक्रीय आहेत का ? हे पाहण्यासाठी आपले वरिष्ठ पदाधिकारी इथं आले आहेत. पुढील बैठकीत आपली सर्व कामे चोख बजावून, शिवसेना घराघरात पोहचली पाहिजे. आपण निवडणूक फक्त जिंकण्यासाठी लढवीत आहोत. याचे भानही ठेवले पाहिजे. असेही माजी आमदार सत्यजित पाटील आबा यांनी सांगितले.

यावेळी कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवाडकर म्हणाले कि, गावागावात पदाधिकारी पोहचले पाहिजे, घर तिथे शिवसैनिक, गाव तिथे शाखा, हा उपक्रम यशस्वी केला पाहिजे. यामध्ये उपतालुकाप्रमुख , तालुकाप्रमुख, बुथप्रमुख अशा संघटनेतील सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपली कामे चोख केली पाहिजेत. तरच आपली संघटना मजबूत होईल. असेही श्री दुधवाडकर यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपप्रमुख नामदेव गिरी यांनी केले. तर सूत्रसंचालन दिनकर लोहार यांनी केले.
यावेळी शाहुवाडी आणि पन्हाळा तालुका संपर्क प्रमुख आनंदराव भेडसे, माजी आरोग्य सभापती हंबीरराव पाटील बापू, जालिंदर पाटील रेठरेकर, माजी उपसभापती दिलीपराव पाटील, शाहुवाडी तालुकाप्रमुख दत्ता पोवार, रामभाऊ कोकाटे, रंगराव किटे, शिवाजीराव सांगळे, कडवे विभागप्रमुख सुरेश चौगुले, माजी पंचायत समिती सदस्य पांडुरंग पाटील, संपत पाटील सोंडोली, शाहीर अनिल तळप, महिला आघाडी संघटिका मंगलताई चव्हाण, अलका भालेकर,आणि शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.