शेड नसलेल्या एसटी थांब्यावर आजही प्रवासी वाट पहात आहेत…
बांबवडे : महाराष्ट्र राज्यात गेली अनेक महिने एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. निश्चितच तो त्यांचा लोकशाही ने दिलेला अधिकार आहे. तो त्यांनी वापरलाच पाहिजे. त्यांचे शासनाकडे वेतनवाढ आणि विलीनीकरण आदी मागण्या आहेत. परंतु शासन विलीनीकरण मुद्द्यावर अडून बसले आहे. परंतु या शासन व एसटी कर्मचारी यांच्या वादात एसटी प्रवासी जनतेचा काय दोष ? आज अनेक विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, तसेच अनेक मध्यमवर्गीय एसटी प्रवासी तासोनतास एसटी ची वाट पहात आजही एसटी थांब्यांवर उभी आहे, याचा विचार कोण करणार ? हा मोठा प्रश्न समाजातून पुढे येत आहे.

एसटी कर्मचारी आणि शासन यांच्यात अद्यापही तूतू-मै मै सुरु आहे. यामध्ये शासन कर्मचाऱ्यांच्या किती अटी मान्य करतात, हा शासनाचा प्रश्न आहे. परंतु सर्वसामान्य वर्गाने एसटी कर्मचारी किंवा शासन यांचे काय बिघडवले आहे ? हा प्रश्न आजही तसाच आवासून आहे. आजही वृद्धवर्ग तसेच ज्येष्ठ नागरिक सुविधा घेणारे आजही शेड नसलेल्या एसटी थांब्यांवर उन्हातान्हात एसटी ची वाट पहात उभे राहतात. कारण दुचाकी अथवा चार चाकी घेण्यासाठी त्यांचे आर्थिकमान तेवढे सक्षम नाही. परंतु शासनाचे अनेक कर मात्र हि मंडळी इमाने-इतबारे भरत असतात. त्यांचे पैसे, तसेच आयकर भरणारे आयकर दाते यांच्यासहित अनेक कर भरणारी मंडळी शासनाची तिजोरी भरत असतात. परंतु याचे शासनास मात्र सोयरसुतक नाही. तसेच जे कर्मचारी संपासाठी बसले आहेत, त्यांच्या घरातील सुद्धा ज्येष्ठ नागरिक या एसटी ची वाट पहात आहेत.

तेंव्हा एसटी कर्मचारी, तसेच शासन यांनी प्रवासी जनतेची जि मुस्कटदाबी करून ठेवली आहे, त्यातून सामान्य जनतेची सुटका करावी, यासाठी काय करावे लागणार, हे आपण ठरवावे, परंतु एसटी मात्र रस्त्यावर पूर्वीच्याच क्षमतेने धावली पाहिजे. अशी मागणी जनतेतून होत आहे. अन्यथा सामान्य जनता रस्त्यावर उतरल्यास त्याचे परिणाम शासनासाहित अनेकांना भोगावे लागतील.