शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही गाफील राहणार नाही -रणवीरसिंग गायकवाड
बांबवडे : सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजेसाठी सेवा संस्था हे एक प्रमुख साधन असून, गेल्या ४५ वर्षात शेतकऱ्यांच्या प्रत्येक गरजेसाठी सेवा संस्था उभी राहिली. यासाठी मानसिंगदादा यांनी आपले श्रेय पणाला लावले होते, परंतु दुर्दैवाने गत निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण या निवडणुकीत मात्र कोणत्याही क्षणाला आम्ही गाफील राहणार नाही. आणि शेतकऱ्यांचा स्वाभिमान पुन्हा एकदा विजयी होईल, असा आमचा ठाम विश्वास आहे. असे मत सेवा संस्था गटातून उमेदवार असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस चे युवा नेतृत्व रणवीरसिंग गायकवाड यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले.

सध्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक येत्या ५ जानेवारी २०२२ रोजी होत आहे. यासाठी मानसिंगराव गायकवाड यांची देखील उमेदवारी सेवा संस्था गटातून दाखल करण्यात आली होती. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून, रणवीरसिंग गायकवाड यांची उमेदवारी सेवा संस्था गटात कायम राहिली आहे.

यावेळी बोलताना रणवीरसिंग गायकवाड पुढे म्हणाले कि, सध्या शेतकरी अगोदरच विविध कारणांनी हैराण झाला आहे. त्याच्यावर अतिवृष्टी, पूर यांच्या सोबतच कोरोना सारख्या महामारी चे संकट देखील घोंघावत आहे. अशावेळी कोल्हापूर जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सावरणे गरजेचे आहे. त्यांना नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. यासाठी आमची उमेदवारी आहे.

सध्या शाहुवाडी तालुक्यात एकूण ९९ सेवा संस्था ठरावदार आहेत, त्यापैकी राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना यांच्याकडे ६० सेवा संस्था असून, जनसुराज्य आणि कॉंग्रेस कडे ३९ संस्था आहेत. त्यामुळे एकंदरीत विजय आमचाच असून, तो केवळ आमचा नसून, सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विजय आहे. केवळ राजकारण न करता सामाजिकदृष्ट्या शेतकऱ्याच्या हितासाठी हा विजय गरजेचा आहे. असेही रणवीरसिंग गायकवाड यांनी सांगितले.