शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे – नामदेव गिरी शिवसेना जिल्हा उपप्रमुख
बांबवडे :अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई त्वरित जाहीर करण्यात यावी, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित सरसकट कर्जमुक्ती देण्यात यावी.पिक विम्याचे कठीण निकष बाजूला ठेवत, तसेच पंचनाम्या सारख्या प्रक्रिया सुद्धा बाजूला ठेवत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्व कर्जातून मुक्ती मिळावी. विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्याच्या खात्यात जमा व्हावी. अतिवृष्टीमुळे घरे, व पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जुने निकष न लावता शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना पुरेसा मोबदला त्वरित देण्यात यावा. अशा मागण्यांसाठी शाहुवाडी तसेच पन्हाळा तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांनी शाहुवाडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. उपरोक्त मागण्यांचे निवेदन प्रभारी तहसीलदार श्री गणेश लव्हे यांना देण्यात आले.
विधानसभा निवडणुकीवेळी सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. ते अद्याप पूर्ण केलेले नाही. त्यावर त्वरित कार्यवाही. व्हावी. राज्यातील शेतकरी सतत च्या नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अवकाळी पाउस, गारपीट यामुळे हैराण झाला आहे. केलेल्या शेतीतून उत्पादनाचा खर्च सुद्धा निघत नाही. महागडी खते, औषधे, कीटकनाशके यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमीभाव मिळत नाही. त्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. शेतातील पिकांना योग्य बाजारभाव देखील मिळत नाही. यामुळे शेतकरी बँक, सावकारांकडून उपजीविकेसाठी कर्ज घेताना दिसत आहे. त्यामुळे अनेकांना थकबाकीमुळे नोटीसा, जप्ती कार्यवाही, होत असल्याने मानसिक तनावापोटी आत्महत्त्या सारखी टोकाची पावले उचलावी लागत आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती हीच तातडीची आणि परिणामकारक उपाययोजना आहे. हि कर्जमुक्ती सर्व प्रकारच्या कर्जावर व्हावी. यामध्ये थकबाकीदार चालू कर्ज बाकीदर, यांच्यासह अल्प मुदतीचे पिक कर्ज, मध्यम मुदतीचे सिंचन व उपकरण कर्ज, शेडनेट, पॉली हाउस, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज, तसेच सावकारी कर्ज यांचासुद्धा समावेश असावा. अशा आशयाचे निवेदन शाहुवाडी तहसील कार्यालयाला दिले आहे.
या निवेदनावर शिवसेना जिल्हा उपप्रमुख नामदेव गिरी तालुका प्रमुख दत्ता पोवार, पन्हाळा तालुका प्रमुख बाबा पाटील यांच्यासह महिला आघाडी प्रमुख अलका भालेकर हेमंत पाटील , विनायक कुंभार आदी मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.