शेतकऱ्याच्या आर्थिक कण्याचे प्रतिबिंब म्हणजे ” आनंदराव तात्या “- :” मीरा पाटील ” गोकुळ च्या रिंगणात
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील धवलक्रांतीचे जनक स्व. आनंदराव पाटील भेडसगावकर आणि सर्वसामान्यांचे तात्या हे होत. ज्या गोकुळ ची मदार खांद्यावर ज्यांनी एकेकाळी वाहिली होती, त्यांच्या स्नुषा सौ मीरा उदय पाटील यांनी सध्याच्या गोकुळ च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या माध्यमातून स्व.आनंदराव तात्यांचा वारसा पुढे चालवायचा असा त्यांचा मानस आहे.

स्व. आनंदराव तात्या हे शाहुवाडी तालुक्यातील सर्व सामान्य जनतेचा आर्थिक कणा होते. प्रत्येक गावात दुध संस्थेची उभारणी करीत, आयाबहीनींच्या कनवठीला काही रुपये यावेत, यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. त्या काळात गोकुळ दुध संघामध्ये तात्यांच्या शब्दाला वजन होते. तात्यांनी अनेक घरांची चूल चालवली,असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आजही अनेक घरात तात्यांचा फोटो देवासारखा पुजला जातो. या माणसाने अनेक आर्थिक दुर्बल घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. या माध्यमातून गोकुळ संघाला घराघरात पोहचविले होते.

परंतु त्यांच्या निधनानंतर त्वरित अनेक राजकारणाच्या उकळ्या फुटू लागल्या, आणि इमाने इतबारे केलेली जनतेची, आणि गोकुळची सेवा काही दिवसातंच पडद्याआड झाली. त्यांच्या निधना नंतर त्यांच्या कार्याकडे सोयीस्करपणे पाठ फिरवण्यात आली. आणि तात्यांच्या कुटुंबाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. हा इतिहास सामान्य जनता अद्याप विसरलेली नाही.

म्हणूनच त्यांच्या स्नुषा सौ मीरा उदय पाटील , या ” गोकुळ ” च्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. भले त्यांचा चेहरा आज सगळ्यांसाठी जरी नवीन असला, तरी तात्यांच्या कार्याचा विसर, अजून जनतेला पडलेला नाही, आणि भविष्यात पडणार देखील नाही. कारण त्या माणसाने केलेल्या कार्यामुळेच आज अनेकांच्या चुली चालू आहेत.

शाहुवाडी तालुक्यात गोगवे येथील चिलिंग सेंटर आणताना, अनेकांनी त्याला विरोध केला. परंतु आज याच चिलिंग सेंटर चे प्रतिदिन दुध संकलन सुमारे ९५ हजार लिटर होत आहे. पूर्वी हे दुध कोल्हापूरला जायचे. पण वाहतुकीचा वेळ व इतर प्रक्रियेचा वेळ पाहता हजारो लिटर दुध वासात निघायचे. त्याचा फटका सामान्य दुध संस्थांना बसायचा. आणि संस्था तोट्यात यायच्या. पण तात्यांसारख्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यामुळे सामान्य संस्थेची फरपट थांबली. आज याच चिलिंग सेटर मध्ये भागातील अनेक तरुण नोकऱ्या करीत आहेत. एकंदरीत काय त्या अवलिया मुळे आज शाहुवाडी तालुक्यात दुधाची क्रांती झाली. शेतकऱ्याची काही पैशाला का होईना खात्री झाली.

आज त्याचं तात्यांच्या स्नुषा डॉ. मीरा उदय पाटील आपल्या सासऱ्यांचा वारसा चालविण्यासाठी गोकुळ च्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. आणि सर्वसामान्य शेतकरी तात्यांची ओळख आपल्या मतांद्वारे दाखविल्याशिवाय राहणार नाही.आणि तात्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहतील.