” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….
बांबवडे : अखेर दख्खन चा जोतीबा मुक्त चेहऱ्याने हसला. शाहुवाडीचा धोपेश्वर आनंदाने तांडव करू लागला, येळवण च्या जुगाई नं आपल्या बाळाला कुशीत घेतलं, आणि उद्गीरीच्या काळूबाईनं गुलालात न्हाऊ घातलं. आणि अखेर शाहुवाडी तालुक्यात कर्णसिंह गायकवाड यांचा गोकुळ च्या अटीतटी च्या आणि प्रतिष्ठेच्या लढाईत विजय झाला.

हा विजय आहे स्व.आमदार संजयदादांच्या आनंदाश्रूंचा , हा विजय आहे जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या विश्वासाचा, हा विजय आहे नाम.हसन मुश्रीफ साहेबांच्या आशीर्वादाचा, तर हा विजय आहे शाहुवाडी चे आमदार डॉ. विनय कोरे यांच्या अथक परिश्रमाचा आणि सहकार्याचा.

कोल्हापूर जिल्हा सह.दुध उत्पादक संघ म्हणजेच ‘ गोकुळ ‘ ची निवडणूक झाली, आणि त्याची मतमोजणी ची प्रक्रिया आज संपन्न झाली. या प्रक्रियेत खऱ्या अर्थाने राबणाऱ्या शेतकऱ्याच्या हक्काचा विषय महत्वाचा मानला गेला, आणि गेली अनेक वर्षे एकहाती चाललेल्या कारभाराला लगाम बसला. एकेकाळी स्व. चुयेकर साहेब व स्व. आनंदराव पाटील भेडसगावकर तात्या ,स्व. आम.संजयसिंह गायकवाड या तिघांशिवाय महाडिक मंडळींना विचारणारं कोणी नव्हतं. ते धाडस नाम. सतेज उर्फ बंटी पाटील यांनी नाम. हसन मुश्रीफ साहेब व डॉ.विनय कोरे साहेब यांच्या सहकार्याने केले आणि, अवघं चित्रं पालटलं. आज अनेक बुजुर्ग मंडळींना खऱ्या अर्थाने मनापासून आनंद झाला असेल. कारण संजय दादांच्या नंतर अवघ्या काही दिवसातच या मंडळींनी आपले रंग दाखवले. आणि तत्कालीन संचालिका संजीवानिदेवी गायकवाड यांच्याकडून त्यांचे संचालक पद काढून घेतले. स्व.आनंदराव तात्यांच्या निधानंतर सुद्धा विजय पाटील यांना संचालक पदी घ्यायला त्यांनी नकार दिला. अशा अनेक गोष्टी या मंडळींनी केवळ सत्तेच्या मस्तीत केल्या. पण प्रत्येक गोष्टीला अंत हा असतोच. गोकुळ सारखा दुध संघ मल्टीस्टेट करून, ज्यांनी हा संघ वाढवला त्यांच्या हातात केवळ शेण काढायचं फावडं रहावं, व दुधावरचं लोणी दुधासहीत वरपण्याचा त्यांचा डाव सतेज पाटील यांनी त्यावेळी मोडीत काढला, म्हणून आज हा संघ शेतकऱ्यांकडे शाबूत राहिला आहे. एकीकडे गडगंज धनशक्ती असूनही, आज मात्र महाडिक यांची घागर रिकामीच राहिली.असो.

कर्णसिंह यांचा विजय म्हणजे शाहुवाडी तालुक्यातील सामान्य जनतेला गुढ्या तोरणे लावू दारी,असा झाला आहे. दादांच्या निधनानंतर कर्णसिंह यांची खूप ससेहोलपट झाली. अनेकांनी त्यांना नावे ठेवली, परंतु ” शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे ” या तुकाराम महाराजांच्या उक्तीनुसार या माणसाचा तोल कधी ढासळला नाही. म्हणूनच आज गुलालाची आंघोळ होवू लागली आहे. सामान्य जनता आज खऱ्या अर्थाने भरून पावली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

त्यांच्या या विजयाबद्दल त्यांच्यासहित त्यांच्यासोबत असणाऱ्या सर्वच मंडळींचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने मनापासून अभिनंदन.