संत ज्ञानेश्वर घुंगुर शाळेच्या शिक्षकांचा गलथान कारभार : कारवाई न झाल्यास टाळे ठोकणार -ग्रामस्थांचा इशारा
बांबवडे : श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय घुंगुर तालुका शाहुवाडी येथील शिक्षकांच्या गलथान कारभारामुळे १८ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेपासून वंचित राहिल्याने, घुंगुर येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. संबंधित शिक्षकांवर कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी शिक्षणाधिकारी , तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर यांना दिले आहे. संबंधितावर कारवाई न झाल्यास शाळेला टाळे ठोकणार, तसेच भविष्यात विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या शाळेत आम्ही विद्यार्थी पाठवणार नाही, असेही ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

याबाबत सविस्तर हकीकत अशी कि, श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय घुंगुर या शाळेतील एन,एम.एम.एस. या शिष्यवृत्ती परीक्षेस ८ वी चे १८ विद्यार्थी बसले होते. या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र कोतोली इथं आले असताना, शिक्षकांच्या गलथान कारभारामुळे केंद्र कोणते याची चौकशी न करता, त्यांना बांबवडे इथं विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आणण्यात आले. परंतु त्यांचे परीक्षा केंद्र कोतोली असल्याने इथं त्यांची परीक्षा घेण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस मुकले आहेत.

याबाबत ग्रामस्थांचे असे म्हणणे आहे, कि, येथील मुख्याध्यापक श्री अरविंद पाटील यांनी त्यांच्या शिपायाचा अर्ज घुंगुर ग्रामपंचायत च्या सरपंच पदासाठी भरला होता. तसेच शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक या शिपायाच्या प्रचारात मग्न होते. दरम्यान दि. २० डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागला असता, ते पराभूत झाले. आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी मतदान न केल्याच्या रागापोटी त्यांनी जाणून बुजून विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे. तसेच येथील शिक्षक वर्ग गावाच्या राजकारणात सतत मग्न असतात. दरम्यान केंद्र कोतोली असल्याचे १५ दिवसांपूर्वी शाळेला कळविण्यात आले होते. तरीही शिक्षकांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पहिले नाही.

दरम्यान शाळेत बेकायदेशीर चार शिपायांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सदर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र चुकल्याबद्दल घरी सांगू नका, असा दम सुद्धा विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे.

तसेच बुद्धीबळ स्पर्धेत पार्थ ज्ञानदेव सावरे हा विद्यार्थी तालुकास्तरावर पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होवून सुद्धा जिल्हास्तरावर त्याला पाठविण्यात आले नाही, असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

तसेच येथील मुख्याध्यापकांवर अनैतिकतेचे आरोप सुद्धा गावातून होत आहेत. असे येथील सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले .
यावेळी सामाजिक कार्यकते युवराज पाटील, माजी सरपंच व विद्यमान सदस्य बाजीराव सावरे, आनंदा खोत, आनंदा कडव, भारतीय जनता पार्टी चे शाहुवाडी तालुका सरचिटणीस संजय खोत व ग्रामस्थ उपस्थित होते.