सामान्य जनतेच्या आयुष्यातील बाप माणूस हरपला – मानसिंगराव गायकवाड
बांबवडे :अजित दादांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला आहे. महाराष्ट्रामध्ये कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. सर्व सामन्यांच्या आयुष्यातील “ बाप माणूस ” हरपला आहे. अशा अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री मानसिंगराव गायकवाड दादा यांनी व्यक्त केले.
बांबवडे तालुका शाहुवाडी येथील एसटी स्थानकासमोर सर्व पक्षीय शोकसभा संपन्न झाली. यावेळी मानसिंगराव गायकवाड दादा बोलत होते.
यावेळी मानसिंग दादा पुढे म्हणाले कि, महाराष्ट्रातील राजकारण, समाजकारण आणि प्रशासन यांचा अजितदादांना गाढा अभ्यास होता. प्रशासनावर पकड असणारं उमदं नेतृत्व म्हणजे अजितदादा. असं नेतृत्व पुन्हा जन्माला येणं अशक्यच आहे. शेतकरी, कष्टकरी, आणि सामान्य जनतेच्या विकास कार्याचे वादळ शांत झालं आहे.
या शोकसभेत मानसिंग दादा भावनावश झाले होते. उदय सह. साखर कारखाना निर्मिती मध्ये अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे. या काळात माझे खंदे पाठबळ म्हणजे दादा होते. त्यामुळेच मी राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये दाखल झालो होतो. आमच्या गायकवाड घराण्याचे आणि पवार कुटुंबियांचे घरोब्याचे संबंध होते. असं हे नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेले आहे. शाहुवाडी तालुक्याच्या वतीने तसेच आम्हा गायकवाड परिवाराच्या वतीने त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.
यावेळी मानसिंग दादांचा अश्रूंचा बांध फुटला. त्यांना अश्रू अनावर झाले, दादांच्या डोळ्यात अश्रू पाहण्याचा तालुकावासीयांचा हा पहिलाच अनुभव होता.
या शोकसभेत जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड, महादेव पाटील साळशीकर, जगदीश होळकर (नाशिक ), संदीप पाटील, शाहुवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश डोंगरे, पत्रकार अमर पाटील, संदीप कांबळे, विक्रम वग्रे, विष्णू पाटील सर, अनिल पाटील सोनवडे आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अजित दादांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी युद्धविरसिंग गायकवाड, बांबवडे चे सरपंच भगतसिंग चौगुले, अभयसिंह चौगुले, कृष्णात पाटील, सुवर्णा दाभोळकर, अमर निकम, संजय निकम, दत्ता शिंदे बांबवडेकर, आदी बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. गुरुवार दि. २९ जानेवारी २०२६ रोजी बांबवडे बाजारपेठ बंद राहणार असल्याचे घोषित करण्यात आले. प्रास्ताविक व आभार अमर पाटील यांनी व्यक्त केले.
