” साळशी ” त दारू विक्रेत्यांचा हैदोस : पोलिसांची बघ्याची भूमिका
बांबवडे: साळशी तालुका शाहुवाडी इथं अनधिकृत दारू विक्रेत्यांनी थैमान घातले असून, ग्रामस्थांना बघून घेण्याची भाषा केली जात आहे. अशी परिस्थिती असतानाही पोलीस खाते संबंधितांवर कोणतीही कारवाई करीत नाही. म्हणून साळशी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा बांबवडे पोलीस चौकी इथं दारू विक्रेत्यांविरोधात निवेदन दिले आहे, आणि सबंधित दारू विक्रेत्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. सदर घटनेचे निवेदन फौजदार शैलजा पाटील यांनी स्वीकारले असून, याबाबत वरिष्ठांना कळवून कारवाई केली जाईल, असे फौजदार पाटील यांनी सांगितले.
साळशी ता. शाहुवाडी एक छोटंसं गाव. इथली लोकसंख्या देखील मर्यादित आहे. असे असतानाही या गावात अनधिकृत दारू मात्र खुले आम मिळत आहे. या दारूसाठी पंचक्रोशीतील मद्यशौकीन इथं आवर्जून भेट देतात. या दारू विक्रेत्यांच्या विरोधात २०१७ सालापासून लढा सुरु आहे. तरीसुद्धा इथली दारू बंद करण्याची पोलिसांची काय बिशाद? असे वातावरण गावात निर्माण झाले आहे. यामुळे हा दारू विक्रीचा धंदा पोलिसांच्या आशीर्वादामुळे निर्धास्तपणे सुरु आहे, अशी समाजात परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या अनधिकृत दारू विक्रेत्यांना पोलिसांचे भय नाही का ?असा प्रश्न सहज पडू लागला आहे. दरम्यान कोरोना संक्रमण काळ सुरु असून गावातील कोरोनापिडीत संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत सुद्धा हे विक्रेते निर्धास्तपणे आपला व्यवसाय करीत आहेत. दरम्यान गावातील बाबासो मारुती पाटील, रहाणार सभापती गल्ली , तसेच सुभाष गणपती सकटे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दाखल केली आहे. सदर मंडळींवर त्वरित कारवाई व्हावी, अशी अपेक्षा गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. यावर कारवाई न झाल्यास वरिष्ठ पातळीवर संपर्क साधला जाईल,असाही इशारा संबंधितांनी दिला आहे.