साळशी, सोनवडे फाट्यावर वाहतूक नियंत्रण फलक गरजेचे
बांबवडे : साळशी, सोनवडे फाटा हा अपघाताचा ब्लॅक स्पॉट ठरत आहे. या दोन्ही फाट्यावरून येताना मूळ रस्त्याचे वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघाताच्या शक्यता वाढताना दिसत आहेत.
शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे ते पिशवी या मुख्य रस्त्यावर साळशी व सोनवडे हि दोन्ही गावे येतात. मुख्य रस्त्यापासून साळशी हे गाव डाव्या बाजूला अंदाजे १ किलोमीटर वर आहे. तर सोनवडे हे गाव मुख्य रस्त्याला लागुनच आहे. हि दोन्ही गावे संवेदनशील आहेत. इथ राजकीय पुढारी, तसेच कारखाना अधिकारी कर्मचारी यांची निवासस्थाने आहेत. त्यामुळे इथ वाहतुकीची वर्दळ सतत असते. बांबवडे ते पिशवी या मुख्य रस्त्यावर हि दोन्ही गावे परस्पर विरोधी दिशेला आहेत. त्यामुळे या ठिकाणी चौक निर्माण झाला आहे. तसेच रस्त्यालगत शेतकऱ्यांची शेती आहे. त्यामुळे मुख्य रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिक दुकाने आहेत. यामुळे साळशी गावाकडून येणारी वाहने तसेच सोनवडे गावाकडून येणारी वाहने सरळ मुख्य रस्त्यावर येतात. दरम्यान पिशवी कडे जाणारी वाहने आपल्या दिशेने जात असल्याने या दोन्ही गावांकडून येणाऱ्या वाहनांमुळे येथे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. दोन्ही गावांकडून येणाऱ्या वाहनांना, दुकानांमुळे मुख्य रस्त्यावरील वाहन दिसत नाही. येथील अपघात जरी किरकोळ असतील, तरी भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही.
यामुळे या चौकात वाहतूक नियंत्रणाचे फलक वाहतूक पोलिसांनी लावणे, हि अत्यावश्यक गरज होवू लागली आहे.

