सावे च्या डिजिटल विद्यामंदिर ला निधी कमी पडणार नाही – आमदार डॉ. कोरे
बांबवडे (दशरथ खुटाळे ) : विद्यामंदिर सावे तालुका शाहुवाडी या विद्यामंदिर चा शताब्दी महोत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.

राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची शाळा डिजिटल च्या युगात खऱ्या अर्थाने डिजिटल झाली असून, भविष्यात या शाळेसाठी कधीही निधीची कमतरता भासणार नाही, याची ग्वाही देतो. असे आश्वासन विद्यमान आमदार डॉ.विनय कोरे यांनी या शताब्दी सोहळ्यात ग्रामस्थांना दिले.

विद्यामंदिर सावे हि शाळा गेल्या दशकात नेहमीच चर्चेत राहिली आहे. सावे हे गाव जरी संवेदनशील असले, तरी शाळेसाठी किंवा विकासात्मक कामासाठी सावेकर नेहमीच एक झालेले दिसतात. गेल्या दशकात या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी या शाळेसाठी सढळ हस्ते सहकार्य केले आहे.

शाळेच्या शताब्दी महोत्सवाची सुरुवात ग्रामस्थांनी एकदिलाने गुढी पाडव्या अगोदरच गुढ्या उभारून केली . या शताब्दी सोहळ्यात सुरुवातीला ग्रंथ दिंडी काढून ज्ञानाची किंमत किती असते, याचे प्रत्यंतर दिले.

शाळेच्या शताब्दी सोहळ्यास उपस्थित राहून डॉ. विनय कोरे यांनी सावेकारांची स्तुती केली. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, या शाळेने अनेक राजकीय व्यक्तिमत्व, तसेच अधिकारी, उद्योगपती, आणि अनेक क्षेत्रात नाव कमावलेली मंडळी या शाळेने सावे गावाला दिली आहेत. हि गोष्ट कोल्हापूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. गावचे सरपंच ए.वाय. पाटील यांनी विकासकामांचा निधी शाळेच्या विकासासाठी वापरला आहे. तरीही भविष्यात शाळेला निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही आमदार विनय कोरे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी उद्योगपती संभाजी पाटील यांना समाजरत्न, शिक्षण संचालक पी.जी. साठे यांना जीवनगौरव, प्राध्यापक डी.डी. पाटील, वाय. डी. पाटील यानाही जीवनगौरव , तसेच दत्ता पाटील करंजोशीकर गुरुजी यांना देखील मरणोत्तर जिवन गौरव पुरस्कार देवून , या मंडळींना गौरविण्यात आले.
यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील , माजी जि.प. सदस्य जयवंतराव काटकर, तहसीलदार गुरु बिराजदार आदी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी गोकुळ चे संचालक कर्णसिंह गायकवाड, केडीसी बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड, जि.प. सदस्य विजयराव बोरगे, माजी जि.प. सदस्य नामदेवराव पाटील, भाई भारत पाटील, माजी पंचायत समिती सदस्य महादेवराव पाटील, माजी पंचायत समिती सभापती सुभाषराव इनामदार, पंडितराव नलवडे, हिंदुराव साठे, संतोष भिंगले, पी.एच. पाटील, गटशिक्षणाधिकारी नंदकुमार शेळके, शाळेच्या शिक्षण समिती चे अध्यक्ष सुहास पाटील आणि शिक्षण समिती आदी मान्यवरांसह आजी-माजी विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येवर उपस्थित होते.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शोभा पाटील, तसेच सगळा अध्यापक वर्ग ज्यांनी या शाळेसाठी येथील विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र परिश्रम घेतले. या विद्यमान शिक्षक वृंदा सह जे शिक्षक वृंद येथून बदलून गेले, त्यांनी सुद्धा या शाळेसाठी जीवाचे रान केले. आणि शाळा डिजिटल केली .अशा सर्वच जणांचे , तसेच, शाळेच्या शिक्षण समिती चे अध्यक्ष सुहास पाटील आणि शिक्षण समिती व ग्रामस्थांचे या शाळेला योगदान लाभले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय चौगुले यांनी केले, तर आभार संजय नलवडे यांनी मानले.