राजकीयसंपादकीयसामाजिक

” साहेबांच्या ” भगव्यावर इंथला शिवसैनिक कुर्बान…


बांबवडे : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी एकनाथ शिंदे गट जवळ केला, आणि शाहुवाडी तालुक्यात गट बदलाचं राजकरण घडलं. याबाबत आपण जनतेच्या विकासकामांसाठी शिंदे गटासोबत गेलो , हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न एका (व्हायरल )ऑडीओ क्लिप द्वारे सांगण्याचा प्रयत्न खासदार माने यांनी केला आहे.(जर ती ऑडीओ क्लिप आपलीच असेल तरच हे विधान योग्य होईल.)


त्या व्हायरल क्लिप च्या अनुषंगाने कदाचित त्यांचं म्हणणं योग्य असेल सुद्धा, पण सह्याद्रीच्या मातीला पुन्हा एकदा गट बदलू राजकारणाचा कलंक लागला, हे आपल्याला विसरता येणार नाही. खासदार माने साहेब आपण खासदार व्हायच्या अगोदर माजी खासदार निवेदिता माने वाहिनीसाहेबांचे चिरंजीव आहेत. जिल्हा परिषद कोल्हापूर मध्ये आपण आपल्या अभ्यासातून आपले व्यक्तिमत्व बनवले होते. परंतु ज्या वेगाने ते खासदार झाले, ज्या वेगाने शिवसेनेने त्यांना आपलेसे केले, तो वेग खासदार साहेब आपण विसरलेले दिसताहेत. आपण जनतेच्या विकासकामांसाठी शिंदे गटात गेलात, आपले हे म्हणणे बरोबर आहे. परंतु ज्यावेळी लोकसभेची निवडणूक लागली होती, त्यावेळी आपण शिवसेनेच्या चिन्हावर उभे राहिला होतात. आज भाजप ची सत्ता आहे. या अगोदर च्या पंचवार्षिक मध्ये सुद्धा भाजप चीच सत्ता होती. मग त्यावेळी हि गोष्ट आपल्यासारख्या सुज्ञ माणसाला निश्चित माहित असणार. तरीदेखील तुम्ही शिवसेनेच्या चिन्हावर शिवसेनेसोबत राहण्यासाठी शिवबंधन मनगटी बांधलं होतं. त्यावेळी आपल्याला जनतेने शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडून दिलं होतं. तेही एका शेतकरी नेत्याच्या विरोधात जावून, जनतेने हे दिव्य केलं. ते फक्त भगवा फडकण्यासाठी होतं. आत्ता आपण म्हणाल आम्ही बाळासाहेबांचे आणि दिघेसाहेबांच्या विचारांना पुढे घेवून निघालो आहोत, आम्ही शिवसेना सोडली नाही.


या गोष्टी व्यासपीठावरून बोलताना आपल्याला न्याय मिळाला , हे समजण्यासाठी जुजबी उत्तर आहे. परंतु ज्या उद्धव ठाकरे साहेबांच्या हातून, अवघी शिवसेना बळकावण्याचा प्रयत्न काही नेते मंडळी करीत आहेत. हे कितपत आपल्याला पटतं. अवघी शिवसेना तीही चिन्हासोबत आमचीच आहे, हे सांगण्याचं धारिष्ट नेतेमंडळी करीत आहेत. हे म्हणजे ज्यांची शिवसेना आहे त्यांच्याच घरात राहून त्यांच्यावरच दरोडा टाकण्याचा प्रायत्न होत नाही का ? आपण म्हणता जनतेच्या विकासकामांना आम्ही बांधील आहोत, हे बरोबर आहे,पण त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला आसरा दिला ,त्यांच्याशी केलेला हा कृतघ्नपणा नाही का ? ज्या शिवसैनिकांनी तुमच्या विजयासाठी रात्रंदिवस एक केला,त्यांच्या भावनांचं काय ? असे अनेक प्रश्न आहेत ,ज्यांची आपण मिडिया ला सांगण्यासाठी उत्तरे तयार केली असतीलच, कारण तितके आपण बुद्धिवादी आहात, हे हा मतदारसंघ जाणून आहे. परंतु आपल्या अंतर्मनाला जर आपण विचारलं , तर ते मन मात्र तुमच्याबाजूने निश्चित उभे राहणार नाही, हे सुद्धा तितकेच सत्य आहे.


इथं एकनाथ शिंदे साहेब यांचा गट याबाबत आपल्या मतदारांना काहीच बोलायचे नाही. परंतु त्यांचे खासदार हे त्यांचेच असावेत, अशी भावना मात्र इथल्या शिवसैनिकाच्या मनात निश्चित असेल. आणि आपण त्याच भावनांना सुरुंग लावला आहे. राजकारणात निवडून येणं, आणि पडणं, हे होतंच राहातं. परंतु ज्यांच्या जीवावर निवडून येतो, त्यांचाच कुट्ट्या काढायचा, हे मात्र इथल्या जनतेला रुचलेलं नाही, अशी सामान्य जनतेची भावना आहे.
आपण एका ऑडीओ क्लिप मध्ये सांगितले आहे कि, वरच्या लेवलचं राजकारण आपल्याला समजंत नसतं. पण जाणून घेण्याची गरज सुद्धा शिवसैनिकाला नसते. कारण हि संघटना फक्त भावनांच्या जीवावर आजवर तरली आहे. इथला शिवसैनिक फक्त एका वडापाव वर तुमच्यासाठी रानोमाळ भटकायला तयार असतो. परंतु त्यांना त्यांच्या साहेबांनी सांगितलेला उमेदवार निवडून आणायचा असतो. इथं दगडाला सुद्धा शेंदूर फासून निवडून देण्याची परंपरा या संघटनेत आहे. आम्ही पक्ष म्हणत नाही, तर संघटना म्हणतोय, याचं कारण इथला शिवसैनिक बाळासाहेबांवर आणि त्यांच्या ठाकरे परिवारावर जीव ओवाळून टाकायला तयार असतो. असो.


आपण सुज्ञ आहात, अनेक शिवसैनिकांच्या भावना आम्ही आमच्या संपादकीय च्या माध्यमातून जनतेसमोर मांडल्या आहेत. आपण कोणत्याही गटात गेलात, तरी ते आपलं स्वातंत्र्य आहे. परंतु साहेबांच्या भगव्यावर मात्र इथला शिवसैनिक कुर्बान आहे. असाच आमचा अनुभव आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!