हातकणंगले मधून शिवसेनेचे ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील आबा
बांबवडे : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्यावतीने शाहुवाडी चे माजी आमदार सत्यजित पाटील आबा यांची लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशी माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान या मतदारसंघासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांना उमेदवारी देण्याचे संकेत येत होते. परंतु राजू शेट्टी यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढण्यास नकार दिल्याने, शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार श्री सत्यजित पाटील सरुडकर (आबा ) यांची उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान सत्यजित आबांना उमेदवारी जाहीर झाल्याने शिवसैनिकांनी बांबवडे इथं फटाके वाजवून जल्लोष साजरा केला.
सत्यजित आबा हे दोन वेळा विधानसभेचे आमदार राहिले आहेत. तसेच ते माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर यांचे चिरंजीव आहेत. केवळ राजकीय पार्श्वभूमी त्यांच्या पाठीशी आहे, एवढेच नव्हे तर सत्यजित आबा जिल्हापरिषद सदस्य पदापासून राजकीय वाटचाल करीत आहेत. त्यामुळे राजकारणाबरोबरच विविध विकास कामांचा देखील त्यांना अभ्यास आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत खासदार धैर्यशील माने यांच्या विजयात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्याचबरोबर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यासोबत देखील त्यांचा चांगल समन्वय आहे.
यामुळेच तालुक्यातील पदाधिकारी आनंदराव भेडसे, नामदेवराव गिरी, विजय लाटकर, दत्तात्रय पोवार आदी मंडळी त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि सत्यजित आबा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. खरी जबाबदारी इथून पुढे असून, शिवसैनिक हि जबाबदारी निश्चित पार पाडतील, यात शंका नाही, असे मत येथील पदाधीकारी आनंदराव भेडसे,नामदेव गिरी, यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.
यावेळी विजय लाटकर, वरेवाडी येथील आनंदराव भोसले, सचिन मूडशिंग्कर आदी शिवसैनिक उपस्थित होते.