… हा परखडपणा आहे, कोणाची लाचारी नव्हे.
बांबवडे : महाराष्ट्रातील जनता कोरोना च्या उद्रेकात होरपळून निघत असताना , राज्य शासन कोणत्यातरी मार्गाने परिस्थिती आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे विरोधी बाकावर बसलेल्या नेत्यांना मात्र जनतेचा पुळका येवू लागला आहे. लस मागविण्याच्या नावाखाली, बड्या धेंडांना मागच्या दाराने पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे अवघ्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. तसं पहायला गेलो, तर हेच सत्ताधारी होते. परंतु काही राजकीय खेळी, या मंडळींना नेमक्या भारी पडल्या, आणि सत्ता यांच्या हातातून गेली. तसं त्यांनी पुन्हा गलीच्छ प्रयत्न करून मध्यरात्रीच्या दरम्यान सत्ता मिळविण्याचा प्रयत्नही केला, परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. हे सर्व सांगण्यामागे एकच उद्देश आहे, तो म्हणजे राज्य सरकार राजकारण करतंय, असं हीच मंडळी म्हणताहेत. यासाठीच हा प्रयत्न.

एकीकडे सत्ताधारी मंडळी आम्हाला विश्वासात घेत नाही, म्हणून सांगायचं, आणि घेतलं, तर सर्वांच्या हिताच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयाला विरोध करायचा. लॉकडाऊन ला लॉकशाही संबोधून कोरोना महामारीसारख्या कठीण प्रसंगाची राजकीय व्यासपीठावर स्वत:चे राजकारण साधण्यासाठी महाराष्ट्राची खिल्ली उडवायची. अशी आपल्या विरोधी पक्षाची भूमिका. एकीकडे महराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लशीचा साठा केंद्रशासन उपलब्ध करून देत नाही, तर दुसरीकडे राज्याचे विरोधीपक्षाचे नेते मात्र हा साठा आम्ही उपलब्ध केला, हे सांगण्यासाठी रात्रीच्या प्रसंगी पोलीस ठाण्यात जातात, ते कशासाठी, तर पोलिसांनी, साठेबाजी केली म्हणून चौकशीसाठी बोलविलेल्या व्यक्तीला पाठीशी घालण्यासाठी. आत्ता हे म्हणतील कि, आम्ही हा लशीचा साठा मागविला होता. जर असं आहे, तर कोण्या एका व्यक्तीला किंवा नेत्याला हा साठा मिळू शकतो का? याचे उत्तर जर हो असेल, तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना का मिळत नाही ? हा प्रश्न ऐरणीवरचा आहे. कारण केंद्रशासन म्हणजे कोण ?.इतर राज्यांसाहित आम्ही महाराष्ट्रीयन जनतेने निवडून दिलेले खासदारंच ना. मग ते कोणत्याही पक्षाचे असोत. केंद्रात आज भाजप आहे, तर महाराष्ट्रातले भाजप चे खासदार तिथे दिल्लीत जावून काय करताहेत , राज्यासाठी लस मागणे,हे त्यांचे कर्तव्य नाही का ? हा प्रश्न महत्वाचा आहे. यापैकी एक महाशय खासदार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना रडतलक्ष्मी म्हणतात. मुख्यमंत्री कुठं, असा असतो का ? असे एकेरी शब्दात उच्चारतात. याला काय म्हणायचे? अहो मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा आहे, हे महत्वाचे नसून, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत,ज्यांना राज्यातील जनतेने निवडून दिले आहे. भले ते इतर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून असोत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एकेरी संबोधणे, हे कोणत्या शिष्टाईत बसते, हे कळत नाही. कि हे महाशय, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी एकेकाळी यांना रांगड्या भाषेत हासडले होते ,त्याचा राग आत्ता त्यांच्या चीरंजीवांवर काढताहेत. यावर कढी म्हणून कि काय, राज्याचे शिवसेनेचे,कॉंग्रेस चे, राष्ट्रवादी कॉंग्रेस चे आमदार आणि खासदार याबाबत त्या खासदारांना काहीच उत्तर देत नाहीत, हि लाजिरवाणी बाब आहे. एकीकडे निवडणुकीच्या प्रचारात तुमच्या तोफा धडाडतात, मग तुमच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना कुणी एकेरी संबोधताना, तुम्हाला ऐकावे कसे वाटते, कि तुम्ही सुद्धा तुमच्या स्वार्थासाठीच सेनेचा वापर केलात, हा जनतेचा प्रश्न आहे. आणि राज्यातील तमाम नागरिकांचा प्रश्न आहे, कारण उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना एकेरी संबोधणे, हा तमाम महाराष्ट्र वासियांचा अपमान आहे. देवेंद्र फडणवीस साहेब जरी या ठिकाणी असते, आणि इतर कुणी असे म्हटले असते, तर त्यावेळी सुद्धा आम्ही हेच बोललो असतो.

शासनाने कोणताही निर्णय घेतला, कि, हि मंडळी अर्ध्या तासाच्या आत, प्रतिउत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावतात. आणि आपल्या अपयशाचे गरळ त्या निर्णयात, कशा चुका आहेत, हे दाखविण्यासाठी जीवाचा आटा-पिटा करतात. एकीकडून फडणवीस साहेब, दुसरीकडून दरेकर साहेब, तिसरीकडून आमच्या कोल्हापूर चे प्रदेशाध्यक्ष साहेब. हि सगळी कमी पडतात कि, काय म्हणून किरीट सोमय्या, आणि अतुल भातखळकर साहेब टेकू द्यायला येतात. अरे तुमचं नेमकं चाललंय काय? याचं या मंडळींनी आत्मपरीक्षण करावे.

कारण आज तुम्हाला सरकार पाडायची जि घाई लागली आहे, त्यानंतर तुम्ही पुन्हा याच महाराष्ट्राच्या जनतेच्या पुढ्यात मतांचा जोगवा मागायला जाणार आहात, याचे भान ठेवा. असो वेळ अजूनही गेलेली नाही. तुम्ही सर्वच लोकप्रतिनिधींनी मिळून, या महामारीवर उपाय काढायचा आहे, तेही श्रेयावादाचा इगो न करता. असे झाले तर ठीक, नाहीतर पुन्हा जनतेसमोर आपल्या ला जायचे आहे. पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना रडतलक्ष्मी म्हणनाऱ्यांनी महाराष्ट्रासाठी काहीतरी करावे, केवळ टीका हे कोणत्याही आपत्तीवरचे उपाय नसून, कधीतरी सौजन्य दाखवावे.

हे संपादकीय लिहित असताना, मी कोणत्या पक्षाची बाजू घेवून लिहित नसून, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अर्वाच्च्य बोलणाऱ्या मंडळींनी तोंडाला लगाम घालावा, यासाठी लिहित आहे. आणि दुसरे म्हणजे आमचे कोल्हापूरचे नेते, मुख्यमंत्र्यांनी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी काहीही बोलले, तर त्याविरोधात बोलण्यासाठी ते सदैव तयार असतात. त्यांनी जर हाच आटा-पिटा कोल्हापूर च्या जनतेसाठी केला असता, तर इथल्या जनतेने त्यांना डोक्यावर घेतले असते. स्वत:ची ग्रामपंचायत घालविण्याची नामुष्की त्यांच्यावर आली नसती. हा परखडपणा आहे, कोणाची लाचारी नव्हे.
