२२ मार्च ला जिल्हा परिषद समोर मुंडन आंदोलन : बहुजन रयत परिषद
बांबवडे : कोल्हापूर जिल्हापरिषद समोर २२ मार्च रोजी सकाळी १०.०० वाजता बहुजन रयत परिषदेच्या वतीने मुंडन आंदोलन करण्यात येणार आहे, असे परिषदे चे संजय धोंगडे यांनी निवेद्नानाद्वारे सांगितले आहे. सावे तालुका शाहुवाडी येथील मागासवर्गीय समाजाचे सभागृह बेकायदेशीर रित्या पाडले आहे, याबाबत अनेकवेळा निवेदने देवूनही यावर कोणतीही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ हे मुंडन आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा देखील बहुजन रयत परिषद च्यावतीने संजय धोंगडे यांनी दिला आहे.

सावे तालुका शाहुवाडी इथं मागासवर्गीय समाजासाठी मंजूर झालेले सभागृह बेकायदेशीर रित्या देवस्थान समिती च्या जागेत २०११ साली बांधले गेले. तरीही गावात याबाबत कोणी फारशी तक्रार केली नाही. परंतु देवस्थान समितीच्या जागेत बांधताना देखील देवस्थान समिती ला याबाबत कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती.

त्यानंतर २१ ते २३ फेब्रुवारी २०२१ रोजी दोन दिवसात सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने हे सभागृह जमीनदोस्त केले. परंतु याबाबत कोणतीही परवानगी घेतली गेली नव्हती. या कृत्याबाबत शासनाला अनेकवेळा लेखी निवेदने दिलेली आहेत. परंतु याबाबत कोणतीही कारवाई अद्याप शासनाच्या वतीने केली गेलेली नाही.

यांच्या निषेधार्थ दुखवटा पाळण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर २२ मार्च ला मुंडन आंदोलन करण्यात येणार असल्याचे, निवेदनाद्वारे बहुजन रयत परिषदेच्या वतीने संजय धोंगडे यांनी सांगितले आहे.