२९ मार्च रोजी शाहुवाडी त ” रास्ता रोको ” – भारतीय दलित महासंघ
बांबवडे : भारतीय दलित महासंघाच्यावतीने मंगळवार दि.२९ मार्च रोजी शाहुवाडी इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तशा आशयाचे निवेदन भारतीय दलित महासंघाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे यांच्याकडून तहसीलदार शाहुवाडी यांना देण्यात आले आहे.

शाहुवाडी तालुक्यात २०२०-२१ साली झालेल्या दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत झालेली विकासकामे निकृष्ट दर्जाची असून, प्लॅन एस्टिमेट प्रमाणे झालेली नसल्याचे स्पष्ट होत आहे. आर्थिक हव्यासापोटी दलित वस्ती च्या विकासासाठी असणारा निधी जिल्हा परिषद व पंचायत समितीतील बांधकाम विभागातील अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगनमताने भ्रष्टाचार करून, दलित समाजाला फसविण्याचे काम केले आहे. हि कामे निकृष्ट दर्जाची असून, सदर प्रकरणी सत्वर खातेनिहाय चौकशी करून संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, तसेच अधिकारी व संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील निवेदनात करण्यात आली आहे.

शित्तूर वारुण तालुका शाहुवाडी येथील दलित वस्ती सुधार योजनेतील सुमारे पाच लाख रुपये खर्चाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, अधिकारी, पदाधिकारी यांनी संगनमताने दलित समाजाला फसविण्याचे काम जिल्हा परिषद आणि पंचायत समिती चे अधिकारी व ठेकेदार यांनी केले आहे.

दलित समाजाला फसविण्याचे काम करणाऱ्या अधिकारी आणि पदाधिकारी , तसेच ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील श्रीकांत कांबळे भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना केली आहे.

सदरच्या निवेदनावर भारतीय दलित महासंघाचे तालुकाध्यक्ष आकाश कांबळे, अमर काळे, महेश हळकुंदे, राजू कांबळे, नागेश कांबळे, मनीष नांगरे, अतुल कांबळे, शिवाजी नांगरे, रोहित साटम, सुजित कांबळे, आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.