५५ विद्यार्थ्यांना फक्त दोन शिक्षक ? – कार्यवाही न झाल्यास स्वातंत्र्यदिनी शाळेस टाळे ठोकणार- अरविंद माने व ग्रामस्थ
तुरुकवाडी प्रतिनिधी ( कृष्णा कांबळे ) : शाहुवाडी तालुक्यातील अमेणी येथील शाळेस सात वर्ग असून , शिक्षक मात्र फक्त दोन आहेत. या शाळेस पुरेशी शिक्षक संख्या न पुरविल्यास स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात स्वातंत्र्यदिनी या शाळेस टाळे ठोकण्यात येईल,अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अरविंद माने यांच्या नेतृत्वाखाली अमेणी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद कोल्हापूर च्या शिक्षण विभागास दिले आहे.

निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे कि, अमेणी तालुका शाहुवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत एकूण ५५ विद्यार्थी आहेत. त्यांना सात वर्ग आहेत. परंतु या शाळेस शिक्षक मात्र फक्त दोन आहेत. इथं सध्या दोन पदवीधर शिक्षक कार्यरत आहेत.

दरम्यान मुख्याध्यापकांना तालुका तसेच केंद्र स्तरावरील बैठकींना उपस्थित राहावे लागते. त्यामुळे फक्त एकच शिक्षक खऱ्या अर्थाने कार्यरत असतो. त्यांनाही आधार कार्ड, मतदार नोंदणी, तहसीलदार कार्यालय, शाहुवाडी पंचायत समिती कार्यालय येथील शासकीय योजना राबविण्यात व्यस्त राहावे लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर खालावत आहे.

याचबरोबर शाळेस वीज, पाणी पुरवठा यांचा अभाव आहे. इथं दोन षटकोनी शाळा खोल्या आहेत, पण त्याही सध्या गळत आहेत. शाळेच्या आवारातच धोकादायक विजेचे खांब, ट्रांस्फार्मर, उघडी फ्युज ची पेटी, सुद्धा या शाळेच्या आवारातच आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका संभवत आहे. या सर्व बाबी शिक्षण विभाग गांभीर्याने घेत नाही.

तेंव्हा येत्या स्वातंत्र्यदिनाच्या अगोदर या सर्व बाबींवर कार्यवाही न झाल्यास, शाळेस ग्रामस्थांच्या वतीने टाळे ठोकण्यात येईल, याची शिक्षण विभाग व वरिष्ठ कार्यालयांनी नोंद घ्यावी, असेही दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अरविंद माने, शाळा अमिती अध्यक्ष गणेश माने, युवराज पाटील, मधुकर पवार, अमित नायकवडी, स्वप्नील माने व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते..